(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur GMC : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात X-Ray फिल्मचा तुटवडा, एक्स-रेचा फोटो रुग्णांच्या मोबाईलमध्ये करुन देतात ट्रान्सफर
फिल्म संपल्याने 'एक्स रे' काढल्यानंतर संगणकावरील 'एक्स रे' चे प्रतिबिंब असलेला फोटो मोबाईलमध्ये ट्रान्सफर करुन घ्या, आणि डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला येथील GMC मधील तंत्रज्ञांकडून दिला जात आहे.
Nagpur News : नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) व रुग्णालयात हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) कालावधीत औषधांपासून तर 'एक्स रे' फिल्म उपलब्ध असतात. अधिवेशन संपले की, एक्स-रे फिल्मचा पुन्हा तुटवडा निर्माण होतो. मात्र यावर्षी हिवाळी अधिवेशन तोंडावर असताना मेडिकलमध्ये (GMC) एक्स रे फिल्मचा तुटवडा आहे. यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून 'एक्स रे' काढल्यानंतर संगणकावरील 'एक्स रे' चे प्रतिबिंब असलेला फोटो मोबाईलमध्ये ट्रान्सफर करुन घ्या, आणि डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला येथील तंत्रज्ञांकडून दिला जातो. एक्स-रेची ऑनलाईन सेवा बंद पडल्याने रुग्णांवर ही वेळ आली आहे.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Maharashtra Government Medical College) 5 जुलै 2022 च्या मध्यरात्री 12 च्या ठोक्याला 'हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम'अंतर्गत (HMIS) असलेली ऑनलाईन सेवा बंद करण्यात आली. मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आली नाही. यामुळे रुग्णांचे कार्ड काढण्यापासून तर डॉक्टरांकडून एक्स रे पाहण्याचे सर्व व्यवहार हे 'मॅन्युअल' सुरु झाले. यासाठी पहिल्या दोन महिन्यात एक्स रे फिल्मचा साठा बऱ्यापैकी होता. परंतु आता एक्स रे फिल्मचा तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक संगणकावरील 'एक्स रे' चा 'मोबाईल'मध्ये फोटो घेऊन तो डॉक्टरांना दाखवत असल्याची माहिती पुढे आली आहे. मेडिकलमध्ये एक्स रे विभागात एक्स रे (X Ray Films) फिल्मचा नेहमीच तुटवडा असतो. यामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.अभिमन्यू निसवाडे यांनी 'एक्स रे' विभागात एक्स रे काढल्यानंतर ऑनलाईन प्रणालीतून एका क्लिकवर 'एक्स रे' बघण्याची सोय डॉक्टरांना उपलब्ध करुन दिली होती. ही सोय सर्व विभागांत सुरु होती. या सोयीमुळे दरवर्षी पंधरा लाख रुपये बचत होत होती. मात्र ऑनलाईन सेवा बंद झाल्याने एक्स रे फिल्मचा तुटवडा निर्माण झाला आहे.
स्मार्ट फोन नसल्यास...
एक्स रे फिल्म नसल्यामुळे काढलेल्या एक्स रेचे प्रतिबिंब बघण्यासाठी मेडिकलचे डॉक्टर मोबाईलचा वापर करत असतात. मात्र ज्या रुग्णांकडे किंवा नातेवाइकांकडे स्मार्ट मोबाईल फोन नाहीत, अशा रुग्णांनी काय करायचे, असा प्रश्न विचारला जात आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनाही स्मार्ट फोन असल्यास मोबाईलवर एक्स रे अपलोड करुन दिला जातो, अपलोड न झाल्यास फोटो काढण्याची सोय करुन देण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
डॉ. आरती आनंद, विभाग प्रमुख, रेडिओलॉजी विभाग यांची प्रतिक्रिया
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय]रुग्णालयात 'एक्स रे'साठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज 500च्या जवळपास आहे. त्यामुळे प्रत्येकाला 'एक्स रे'ची फिल्म प्रिंट करुन देणे शक्य होत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडून विशेष सूचना असल्यास 'एक्स रे'ची फिल्म देण्यात येते. तसेच डॉक्टरही विभागात येऊन फिल्म आपल्या मोबाईलमध्ये घेऊन जातात आणि पुढील उपचार करतात. तसेच रुग्णाकडे असलेल्या फोनमध्येही 'एक्स रे' डाऊनलोड करुन देण्यात येते.
ही बातमी देखील वाचा