Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात ओबीसी आंदोलनाचे अभ्यासक ॲड. मंगेश ससाणे यांच्यावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?

Dhananjay Munde in Vidhansabha: महाराष्ट्रात आजघडीला सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता सुरक्षितपणे फिरु शकत नाही. या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे, असे वक्तव्य परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. ते रविवारी विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी सभागृहात ॲड. मंगेश ससाणे (Mangesh Sasane) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांनी सभागृहात ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाणे यांच्यावरील हल्ल्याबाबत सविस्तर भाष्य केले. प्रसिद्ध वकील व ओबीसी आंदोलन अभ्यासक मंगेश ससाणे यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला झाला. काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावर माजलगावमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. काही जणांनी झुंड करुन त्याचे हातपाय तोडले. तो अजूनही व्यवस्थितरित्या चालू शकत नाही. यामधील एकही आरोपी पकडला गेलेला नाही. ओबीसी आंदोलक वाघमारे यांच्यावरही हल्ला झाला होता. त्यामुळे आजघडीला महाराष्ट्रात सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता सुरक्षितपणे फिरु शकतो का?, हा प्रश्न आहे. या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे. एकमेकांना मारुन सोशल मीडियावर स्टेटस ठेवली जातात, मारहाण करणाऱ्यांना योद्धा म्हटले जाते. त्यांना अटक होत नाही. एकाला शिक्षा होते. परंतु, सारखाच गुन्हा असलेल्या दुसऱ्याला शिक्षा होत नाही. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे की नाही, हा प्रश्न पडतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात तात्काळ उत्तर दिले. परंतु, देवेंद्र फडणवीस यांचे हे उत्तर मोजक्या शब्दांत होते. अध्यक्ष महोदय, यासंदर्भात कड कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Mangesh Sasane attack in beed: ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला
ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे ( Mangesh Sasane ) यांच्या गाडीवर शनिवारी रात्री काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता ॲड. ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ससाणे यांची गाडी थांबवून दगडफेक केली. ॲड. ससाणे यांनी तात्काळ धारूर पोलीस ठाणे गाठत या हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिली. त्यावरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
आणखी वाचा























