Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Mahanagarpalika Election: नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला धडक देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत महाराष्ट्र भाजपच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, आता दोन्ही पक्षांनी सबुराचा निर्णय घेत महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुती होणार हे जवळपास निश्चित झालं असलं तरी आता जागा वाटपावरून पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपमध्ये सामना रंगण्याची चिन्हे आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिंदे सेनेला अधिक जागा देण्यासाठी तयार होणार का? हाच मोठा प्रश्न असेल. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिंदेंकडून 50-50 चा फार्म्युला राहणार आहे.
एमएमआरमध्येही तोच फार्म्युला राहणार
एमएमआरमध्ये जागावाटपासाठी याच फॉर्म्युलानुसार चर्चा होण्यासाठी शिवसेना आग्रही असेल. त्यामुळे एकंदरीतच महायुतीचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपावरून जागा वाटपावरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर नगरसेवक निवडून आले आहेत त्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार आहे. याच फॉर्म्युलानुसार मुंबई महानगरमध्ये जागावाटप करण्यावर शिवसेना आग्रही असेल. या विभागात शिवसेनेची ताकद जास्त असल्याने शिवसेना अधिक जागांसाठी आग्रह राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
महायुतीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरला
दुसरीकडे जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी व महायुतीचा मुहूर्त सुद्धा ठरल्याची माहिती आहे. मुंबईच्या जागांसाठी पुढील दोन दिवसांत पहिली बैठक पार पाडणार आहे. यामध्ये भाजपकडून चार तर शिवसेनेकडून सहा नेते चर्चेसाठी असतील. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह असणार आहे. त्यामुळे एकंदरीत जागावाटपावर कोण नमती भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष असेल. मुंबईत भाजपकडून 150 जागांवर लढण्यास तयारी आहे तर शिवसेना सुद्धा शंभरहून अधिक जागांवर लढण्यासाठी तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मुंबई महानगर प्रदेशामध्ये मोठी चढाओढ होण्याची चिन्हे आहेत.























