Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
पुणे: काँग्रेस नेत्याच्या एका खळबळजनक वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार आहे. देशाच्या पंतप्रधान पदी मराठी माणूस असेल असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे या महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा दावा केला आहे. तर या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत, अशातच पंतप्रधान पदासाठी संधी ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतील कोणाला मिळण्याचा काही विषय नाही कारण आमची संख्या तेवढी नाही, तर नागपुरातील भाजपच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.(Prithviraj Chavan)
Prithviraj Chavan: तर मग नागपूरच्या लोकांना संधी आहे...
मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जवळीत पाहिली तर काय एकंदरीत समीकरण दिसून येते या एका वृत्तवाहिनीच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एक निश्चित आहे की काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा कोणी पंतप्रधान होणार नाही, कारण आमची तिथे संख्याच नाहीये, त्यामुळे झालं तर भाजपचा कोणीतरी होईल, जर असं काही अघटीत घडलं तर मग नागपूरच्या लोकांना संधी आहे, त्या संदर्भात मी बोललो होतो, असंही ते पुढे म्हणालेत.























