ST Nagpur : एसटीच्या देखभालीसाठी भंगारचा निधी, एक कोटीची कमाई
एसटीच्या नागपूर विभागात भंगार गाडी व साहित्याचा नुकताच लिलाव झाला. निकामी झालेल्या गाड्यांचा दरवर्षी लिलावाची प्रक्रीया आहे. यंदा यातून एक कोटीचा निधी उभा राहिला आहे.
नागपूरः संपानंतर एसटी बसगाड्या सक्षमपणे धावणे हे नागपूर विभागासाठी मोठे आव्हान होते. रस्त्यावर गाड्या ब्रेक डाऊन होणे, टायर पंचर होणे अशा अनेक समस्या निर्माण होत होत्या. अजूनही असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे निकामी झालेल्या बसेस आणि इतर साहित्य भंगारात निघाले. हे साहित्य विकून एक कोटीची कमाई नागपूर विभागाने केली आहे. यातून उभा झालेला निधी आता एसटीच्या देशभाल-दुरुस्तीवर खर्च करण्याचा निर्धार नागपूर विभागाने केला आहे.
तोट्यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, कमाई सोबतच प्रवाशांची सेवा याच धर्तीवर महामंडळाचे कार्य सुरू आहे. दोन वर्षापूर्वीचा कोरोना आणि त्यानंतर लगेच कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाने एसटीचे पुरते कंबरडे मोडले. जवळपास अडीच वर्षे एसटीची चाके थांबली. संपानंतर रस्त्यावर गाड्या धावू लागल्या. मात्र, बहुतांश गाड्यांची स्थिती चांगली नसल्याने रस्त्यावर गाड्या बंद पडणे, धक्का मारून सुरू करणे, प्रवासात मध्येच पंचर होणे असे प्रकार होत होते. याकाळात याकाळात एसटीचा प्रवासी खासगीकडे वळला. त्यांना परत एसटीकडे आणण्याचा प्रयत्न नागपूर विभागाकडून होत आहे. चांगली सेवा प्रवाशांना मिळावी कर्मचाऱ्यांसह गाड्यांना अधिक प्रभावी करण्याचा मानस विभागाचा आहे. बंद अवस्थेत असलेल्या बसगाड्यांमध्ये जवळपास 7 पेक्षा अधिक बसगाड्या भंगारात निकामी झाल्या आहेत. तर इतरही साहित्य निकामी झाले. अशा भंगारात पडलेल्या साहित्याचा नुकताच लिलाव झाला आहे.
प्रवाशांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न
या लिलावात निघालेल्या भंगारातील साहित्यातून एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला एक कोटीची कमाई झाली आहे. हा निधी आता एसटीच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी अधिक सक्षमपणे रस्त्यावर धावू शकेल आणि खासगीकडे वळलेला प्रवासी परत एसटीकडे वळेल, असा विश्वास नागपूर विभागाला आहे. भंगार गाडी व साहित्याचा नुकताच लिलाव झाला. निकामी झालेल्या गाड्यांचा दरवर्षी लिलावाची प्रक्रीया आहे. यंदा यातून एक कोटीचा निधी उभा राहिला. हा निधी गाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीवर खर्च करण्यात येणार असून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकडे विभागाचा भर राहणार असल्याचे विभागीय नियंत्रकांनी सांगितले.