नवी मुंबईत प्रेमभंग झालेल्या युवतीला लाखो रुपयांचा गंडा; बंगाली बाबाला अटक
युवतीचा प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी काळी जादू करावी लागेल. असं सांगून बंगाली बाबाने तरुणीकडून जवळपास साडेचार लाख रुपये उकळले.
नवी मुंबई : प्रेमभंग झालेल्या युवतीला लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या बंगाली बाबाला नवी मुंबई क्राईम ब्रॅन्चने अटक केली आहे. खारघर येथे राहणाऱ्या २६ वर्षीय युवतीचे फेब्रुवारी महिन्यात प्रेमभंग झाला होता. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या दरम्यान युवतीने लोकल ट्रेनमधून प्रवास करताना बंगाली बाबाची जाहिरात वाचली होती. ‘प्रेमसंबंधातील अडचणींवर उपाय‘ पाहिजे असल्यास संपर्क साधा असा उल्लेख करण्यात आला होता.
युवतीने सदर मोबाईल क्रमांकवर संपर्क साधला असता समोरील इसमाने तो "बाबा कबिर खान बंगाली" असल्याचे सांगितले. युवतीचा प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी त्याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये काळी जादु करावी लागेल व देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असं सांगितलं. यासाठी वेळोवेळी या बंगाली बाबाने युवतीकडून पुजा विधींसाठी पैसे घेतले. ही रक्कम 4,57,000 एवढी होती.
मात्र एवढे पैसे देऊन देखील काहीच फरक पडत नसल्याने नैराश्य आल्याने सदर युवतीने बाबा कबिर खान बंगाली यास दिलेले पैसे परत मागीतले व पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यावर बाबा बंगालीने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास काळी जादू करुन अपघात घडवून आणेल व तिला नष्ट करेन असं धमकावलं. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर युवतीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादु नियम 2013 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला.
क्राईम ब्रॅंन्च डीसीपी प्रवीणकुमार पाटील यांनी एसीपी विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आरोपीचे वेगवेगळे गुगुल पे क्रमांक, बँक अकाउंट क्रमांक आणि KYC याची माहिती घेतली. तसेच मोबाईल क्रमांक प्राप्त करुन सी.डी.आर. बनवण्यात आले. सदर आरोपी गोविंदनगर, मिरा रोड, ठाणे येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तिथे सापळा रचून आरोपी वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाली (वय 33) याला पोलिसांनी अटक केली. तो मुळचा राहणारा मेरठ, उत्तर प्रदेश मधील आहे. पोलिसी हिसका दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पीडित युवतीने गुगल पे वरून पाठवलेल्या पैशांची एंट्री देखील त्याच्या मोबाईलमध्ये मिळाली आहे.
सदरच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस फिर्यादी यांनी कधीही प्रत्यक्षात पाहिलेले नव्हते, तो कसा दिसतो याची माहिती देखील नव्हती. तसेच आरोपी वारंवार मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण बदलत होता. एवढ्या अडचणी असताना देखील क्राईम ब्रॅन्चला त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले. आरोपी बंगाली बाबाने अजून किती लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे याचा तपास केला जात आहे.