1 लाख रुपयांचे 1 डझन आंबे घेऊन मुंबईकराचा झारखंडच्या 'तुलसी'च्या शिक्षणाला आधार
जमशेदपूरला राहणाऱ्या तुलसी कुमारीची शिक्षणासाठी सुरू असलेली धडपड मुंबईतील एकाला समजली आणि तब्बल दहा हजार रुपयांना एक, असे 1 लाख 20 हजार रुपये तिला एक डझन आंब्यासाठी मिळाले.
मुंबई : आंबे विकून ऑनलाइन शिक्षणासाठी पैसे साठवणाऱ्या तुलसी कुमारी हिला एक ग्राहक असा भेटला, ज्यामुळे तिचे आयुष्यच कलाटणी घेणार आहे. जमशेदपूरला राहणारी तुलसी कुमारी. लॉकडाउनमुळे तिच्या वडिलांचा जॉब गेला आणि अख्ख कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडलं.अश्यात ऑनलाइन शाळा सुरू झाल्या, मात्र ज्यांच्या घरी 2 वेळेचं अन्न नाही त्यांना मोबाईल घ्यायला पैसे कुठून येणार? त्यामुळे तलशीचं शिक्षण थांबलं.
अनेक दिवस वाया गेले. मग तिने स्वतःच या संकटावर टिच्चून उभं राहायचं ठरवलं. त्यासाठी रस्त्यावर आंबे विकायचा व्यवसाय तिने सुरू केला. दिवसाला एखाद दोन डझन आंबे विकून असे किती पैसे गोळा होणार म्हणा. पण तिचे भाग्य उजळले. तिची शिक्षणासाठी सुरू असलेली धडपड मुंबईतील एकाला समजली आणि तब्बल दहा हजार रुपयांना एक, असे 1 लाख 20 हजार रुपये तिला एक डझन आंब्यासाठी मिळाले. "मी आंबे विकून मोबाईल घेणार होती, पण मुंबईत राहणाऱ्या अमेय हेटे यांचा अचानक कॉल आला आणि त्यांनी मला थेट मदत न करता माझ्याकडे आंबे विकत घेतले आणि त्यातून मला मदत केली, आता माझ्याकडे मोबाईल आहे, जो त्याच पैशातून मी घेतलाय, त्यामुळे माझा अभ्यास होत आहे", असे तुलसीने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अमेय हेटे यांना तुलसीची तगमग समजली. व्हॅल्यूअबल एज्युटेन्मेंट या कंपनीच्या आधारे दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण पोचवणाऱ्या अमेय यांना सध्याच्या काळात ऑनलाइन शिक्षणाची गरज वेगळी सांगायची गरज नव्हती... पण तुलसी करत असलेल्या व्यवसायाला देखील त्यांना कमी लेखायचे नव्हते, म्हणून त्यांनी थेट पैसे देण्याऐवजी ती विकत असलेले आंबेच अश्य भावात विकत घेतले की तिला शिक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर येण्याची गरज पडणार नाही... "तुलसी खूप हुशार आणि मेहेनत करणारी विद्यार्थी आहे, आम्ही केलेल्या मदतीने तिचे शिक्षण पूर्ण होणार असेल तर आम्हाला आनंद आहे, यापुढे देखील तिला गरज तेव्हा आम्ही मदत करणार आहोत", असे अमेय हेटे यांनी सांगितले.
आता तुलसीला आंबे विकावे लागत नाहीत, तिने एक स्मार्ट फोन, पुस्तके आणि इंटरनेटचा डेटा प्लॅन विकत घेतलाय... तिला हवे तेवढे शिकायला देऊ अशी तिची आई आता सांगते...आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला आपण जर थेट पैश्याची मदत केली, तर ती परावलंबी होण्याची शक्यता असते, मात्र शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली तर हेच शिक्षण त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करते. अमेय यांनी देखील तुलसीला तिच्या मेहेनातीने मोठे होण्यासाठी हातभार लावलाय... आज अमेय हेटे यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.