पश्चिम रेल्वेची स्वयंचलित दरवाजाची चाचणी पुन्हा अयशस्वी
पश्चिम रेल्वेने 2 ते 5 जानेवारी दरम्यान, एका लोकलमधील तीन नॉन एसी डब्यांना स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला. मात्र स्वयंचलित दरवाजाच्या प्रयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेवर बंद दरवाजे असलेल्या लोकलची चाचणी करण्यात आली आहे. 15 डब्यांच्या लोकलच्या 3 डब्यांत स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले. मात्र ही चाचणी अयशस्वी झाल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती आलेल्या रिपोर्टमधून निदर्शनास आली आहे. दरवाजे बंद असल्याने डब्यात हवा तेवढा ऑक्सिजन येत नसल्याचं चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी स्वयंचलित दरवाजांचा हा प्रयोग कितपत साथ देईल, यावर शंका उपस्थित केली जात आहे.
गर्दी नसलेल्या वेळेत पश्चिम रेल्वेने 2 ते 5 जानेवारी दरम्यान, एका लोकलमधील तीन नॉन एसी डब्यांना स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला. वास्तविक गर्दी कमी असूनही या डब्यातील कार्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. डब्याच्या आत कार्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण 700 दशलक्ष भाग (पार्ट पर मिलियन) पेक्षा कमी असायला हवं, अशी शिफारस आहे. मात्र 2 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या चाचणीत एका डब्यामध्ये 960, दुसऱ्या डब्यामध्ये 900 आणि तिसऱ्या डब्यामध्ये 920 दशलक्ष भाग कार्बन डॉयऑक्साईडची नोंद झाली आहे. यामुळे प्रवाशांना गुदमरण्याचा त्रास होत असल्याचे रेल्वेच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
तसेच लोकलमध्ये गर्दी असलेल्या वेळीदेखील विरार ते चर्चगेट, बोरिवली ते चर्चगेट अशी ही लोकल चालवली गेली. मात्र त्या काळात प्रवाशांना नवीन सिस्टीम न समजल्याने नियमित कालावधी पेक्षा जास्त काळ लोकल वेगवेगळे स्टेशनवर उभी असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे संपूर्ण लोकलचे वेळापत्रक कोलमडून जाईल. आधी जनजागृती करुन त्यानंतर लोकल चालवली जावी, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सगळ्या चाचण्यांचे एकत्र रिपोर्ट करुन एकत्रित निष्कर्ष काढले जातील आणि ते रेल्वे बोर्डाला पाठवले जातील, पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे.