(Source: ECI/ABP News/ABP Majha)
vedanta foxconn: सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालाची पसंती महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर
vedanta foxconn: वेदांता-फॉक्सकॉनकडून गुजरात आणि महाराष्ट्रातील जागेबाबत अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालानुसार तळेगावला झुकतं माप देण्यात आले होते.
Vedanta Foxconn: वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून आता राजकारण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तळेगावची (Maharashtra Talegaon) जागा योग्य असल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते. मात्र, त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. या अहवालाची प्रत 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे.
गुजरात येथील अहमदाबादजवळील ढोलेरा येथे वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प होणार आहे. सेमीकंडक्टरसाठी तळेगाव की ढोलेरा यांपैकी कोणती जागा योग्य आहे, याबाबत कंपनीने संबंधित अहवाल तयार केला होता. या अहवालानुसार, तळेगावची जागा योग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रोजेक्ट नक्की गुजरातला कसा गेला याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. गुजरातच्या जागेमध्ये हवामान विपरित असून मनुष्यबळाची कमतरता असल्याने प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात काय म्हटले?
>> महाराष्ट्रातील तळेगाव:
> वीज-पाणी पुरवठा:
महाराष्ट्रातील तळेगावच्या प्रस्तावित जागेवर वीज आणि पाण्याची सुविधा आहे. त्याशिवाय राज्य सरकार अखंडित पुरवठ्याबाबत याची जबाबदारी घेणार आहे. एमआयडीसीकडून 750 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वीज स्वस्तात उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय प्रस्तावित जागेपासून 10 किमी अंतरात धरण आहे.
> मनुष्यबळ:
महाराष्ट्र : या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ 50 किमी अंतरात उपलब्ध होणार असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. या भागात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाशी निगडीत नामांकित महाविद्यालये आहेत.
200 किमीच्या परिघात इलेक्ट्रोनिक्स आणि इंडस्ट्रीयल क्लस्टर विकसित आहे. प्रकल्पातील उत्पादनांसाठी आवश्यक असणारे ग्राहक, उत्पादक उपलब्ध असल्याचे वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकार तळेगाव फेस-4 मध्ये इलेक्ट्ऱॉनिक्स शहर म्हणून विकसित करणार आहे. हे शहर 10 हजार एकर परिसरात असणार आहे. यामध्ये तळेगाव, रांजणगाव, चाकण आणि रायगडजवळ निर्यात हब देखील असणार आहे.
> लॉजिस्टिक:
तळेगावच्या प्रस्तावित जागेपासून मुंबई आणि पुणे असे दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. तर, 115 किमी अंतरावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे. 132 किमी अंतरावर मुंबईचे बंदर आहे.
30 किमी अंतरावर पुणे रेल्वे स्थानक, पिंपरी रेल्वे स्थानक 45 किमी अंतरावर आहे. त्याशिवाय, पुणे ते नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याशिवाय तळेगाव हे पुणे, मुंबई आणि नाशिक महामार्गाशी जोडले गेले आहे.
> पायाभूत सुविधा:
पुणे हे शैक्षणिक केंद्र आहे. त्याशिवाय, मेट्रो, हॉटेल्स, रुग्णालयांची उपलब्धता असून वातावरण योग्य आहे. त्याशिवाय, राज्य सरकार तळेगाव इलेक्ट्रॉनिक्स सिटी विकसित करताना या भागात अत्याधुनिक सुविधा असलेले निवासी संकुल उभारणार असल्याचे वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
>> गुजरातमधील ढोलेराबाबत अहवाल काय सांगतो?
> वीज-पाणी पुरवठा
ढोलेरामध्ये गुजरात सरकार 5000 मेगावॅटचा सोलार पार्क उभा करणार आहे. त्याशिवाय टाटा पॉवरकडून 100 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. वीज वितरणासाठी खासगी कंपनीसोबत करार करावा लागणार.
पाणी पुरवठ्याबाबत वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात चिंता व्यक्त केली आहे. नर्मदा कालव्यातून पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. पाण्यातील क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी प्लांट उभारावा लागेल.
> मनुष्यबळ
प्रकल्पाच्या जवळपासच्या ठिकाणावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही.
> मागणी-पुरवठा साखळी
सध्या प्रकल्पाच्या प्रस्तावित ठिकाणाजवळ पुरवठा साखळी, व्हेंडर्स आणि ग्राहक उपलब्ध नाहीत. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपन्यांचे प्रमाण नगण्य आहे.
> जमीन
जमीन नापीक, काही ठिकाणी पाणथळ असून पायाभूत सुविधा आणि काही सिव्हिल कामे करावी लागतील. या ठिकाणी जमीन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.
> लॉजिस्टिक
प्रकल्पाच्या प्रस्तावित ठिकाणापासून भावनगर आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध आहे. ढोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. त्याशिवाय 200 किमी अंतरावर पिपाव बंदर आहे. हे बंदर कांडला आणि मुंद्रा बंदरापासून जवळ आहे.
चार पदरी राज्य महामार्ग असून अहमदाबाद-ढोलेरा दरम्यान सहा पदरी एक्स्प्रेसवे प्रस्तावित आहे.
> पायाभूत सुविधा
हवामान प्रतिकूल असून नवीन शहर विकसित करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: