मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्या धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तानसा धरण आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलं आहे.
मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धरणांपैकी आणखी एक धरण आज ओव्हरफ्लो झालं आहे. तानसा धरण आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलं. तानसा धरणाआधी तुळशी, मोडकसागर आणि विहार हे तलावही तुडूंब भरली आहेत.
धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अवघ्या 8 दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी चार तलाव भरुन वाहू लागले आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांत सध्या 9,34,211 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. हा पाणीसाठा मार्च 2019 अखेरपर्यंत पुरेल इतका आहे.
तुळशी, मोडक सागर, विहार पाठोपाठ मध्य वैतरणा तलावही पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच भरण्याची शक्यता आहे. भातसा व अप्पर वैतरणा तलाव 50 टक्के इतका भरला आहे. तर मध्य वैतरणा तलाव 74.20% इतका भरला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जुलै अखेरपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्वच धरणे भरून वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.