Cyrus Poonawalla: 'दोनदा पंतप्रधान होण्याची संधी शरद पवारांकडे होती, पण आता त्यांनी निवृत्त व्हावं'; सायरस पुनावाला यांचा सल्ला
Cyrus Poonawalla: मिस वर्ल्ड 2023 या स्पर्धेच्या एका कार्यक्रमात उद्योगपती सायरस पुनावाला यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे व्यस्थापकीय संचालक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी बुधवारी (30 ऑगस्ट) रोजी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांचे जिवलग मित्र शरद पवार (Sharad Pawar) यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, "शरद पवार यांचं वय झालं आहे, त्यांनी आता निवृत्त व्हावं." सायरस पुनावाला हे यंदाच्या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या मिस वर्ल्ड 2023 या कार्यक्रमाशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात त्यांना अजित पवारांच्या बंडानंतर भाजप-शिवसेनेच्या सरकारविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
शरद पवार दोनदा पंतप्रधान झाले असते : पुनावाला
यावेळी बोलताना सायरस पुनावाला यांनी म्हटलं की, "शरद पवारांकडे दोनदा पंतप्रधान होण्याची संधी होती, पण त्यांनी त्या संधी गमावल्या. ते अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहेत. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची चांगली सेवा केली असती. पंरतु त्यांच्या हातातून संधी निघून गेली. आता जसं माझं वय वाढतंय तसचं त्यांचही वाढतंय, त्यामुळे त्यांनी आता निवृत्त व्हावं." शरद पवार यांनी सायरस पुनावाला यांची मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे. त्यातच सायरस पुनावाला हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्ला शरद पवार किती गांभीर्याने घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा
'लोक माझे सांगाती' या त्यांच्या आत्मचत्रिच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आणि एकच खळबळ माजली. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मंडळींनी भर सभागृहातच साहेबांना निर्णय मागे घेण्याच्या विनवण्या होऊ लागल्या. मात्र यावेळी त्यांच्या निर्णयाला एका व्यक्तीने पाठिंबा दिला ती व्यक्ती म्हणजे अजित पवार. पण पक्षातील लोकांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या. यावेळी अजित पवारांच्या गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मंडळी यांच्याकडून शरद पवारांना निवृत्तीचे सल्ले देण्यात येत होते. परंतु त्यावेळी 'उगाच माझ्या वयाच्या गोष्टी करु नका, वयाचा उल्लेख केला तर महागात पडेल' असा थेट इशारा शरद पवार यांनी दिला होता. पण आता मित्राच्या या सल्ल्यावर शरद पवारांची भूमिका कोणती असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.