'बाप रे बाप' वर्गात घुसला साप! भिवंडीत विद्यार्थ्यांची भल्यामोठ्या सापाला पाहून आरडाओरड
Bhiwandi Latest Updates : विद्यार्थी शिक्षणात गुंग असतानाच त्यांच्या वर्गात भलामोठा साप खिडकीतून वर्गात घुसला. हे पाहताच विद्यार्थ्यांनी दप्तर सोडून वर्गातून पळ काढत एकच आरडाओरड केला
Bhiwandi Latest Updates : भिवंडी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानं आता काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी देखील शाळांमध्ये पोहोचू लागले आहेत. भिवंडीत देखील शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. काल मात्र तालुक्यातील एका शाळेत खळबळजनक प्रकार घडला. विद्यार्थी शिक्षणात गुंग असतानाच त्यांच्या वर्गात भलामोठा साप खिडकीतून वर्गात घुसला. (snake entered the school in Bhiwandi) हे पाहताच विद्यार्थ्यांनी दप्तर सोडून वर्गातून पळ काढत एकच आरडाओरड केला. ही घटना भिवंडी तालुक्यातील लोनाड नजीक चौधरपाडा येथील पंचक्रोशी हायस्कूलमध्ये घडली आहे.
कोरोना काळात राज्यात विद्यार्थांसाठी शिक्षणाचे दार बंद होते. त्यामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेत होते. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होत नव्हत्या, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. मात्र काही महिन्यापूर्वीच पुन्हा ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या. त्यातच भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील हायस्कुलही सुरु करण्यात आली आहे.
त्यातच आज दुपारच्या सत्रात शाळा सुरु असतानाच भलामोठा साप खिडकीतून वर्गात घुसला. या भल्यामोठ्या सापाला पाहून विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होऊन एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनाही वर्गात साप घुसल्याची माहिती मिळाली होती. त्यातच एका शिक्षक नामदेव लोखंडे यांनी सर्पमित्र दत्ता बोबे यांच्याशी संपर्क करून वर्गात साप घुसल्याची माहिती दिली.
भलामोठा साप वर्गातील खिडकीतच असल्याने कोणाचाही वर्गात जाण्याची हिंमत होत नव्हती. त्यामुळे अर्धा तास वर्ग बंद करण्यात आला होता. तर दुसरीकडे माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोबे यांनी घटनास्थळी येऊन या भल्यामोठ्या सापाला पकडले. साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून साडे सात फूट लांबीचा आहे. या सापाला वन अधिकाऱ्याच्या परवानगीने लगेच जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांनी दिली आहे.