राष्ट्रीवादी काँग्रेसची ग्रामीण चेहऱ्याचा पक्ष ओळख बदलायला हवी : शरद पवार
आजचा वर्धापन दिन राष्ट्रवादी जलदिन संकल्प म्हणून साजरा करणार आहे. दुष्काळपरिस्थिती, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गावागांवात जाऊन सकारात्मक कामे करण्याचं आवाहन करण्यात आलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण चेहऱ्याचा पक्ष ही ओळख बदलायला हवी आणि शहरी भागात राष्ट्रवादीचा जोर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आजचा वर्धापन दिन राष्ट्रवादी जलदिन संकल्प म्हणून साजरा करणार आहे. दुष्काळी परिस्थिती, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन सकारात्मक कामे करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीवादीची ग्रामीण चेहरा ओळख बदलायला हवी राष्ट्रवादीचा चेहरा हा ग्रामीण चेहरा आहे, पण 50 टक्के लोकसंख्या नागरी भागात आहे, हे विसरुन चालणार नाही. आता तालुक्या-तालुक्यात नागरिकरण झालं आहे. मुंबईत आपण कमी पडत आहोत, हे मान्य केलं पाहिजे. म्हणून, आजच्या दिवशी हा निर्धार करुया की राष्ट्रवादीची नागरी भागातील व्याप्ती वाढली पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.मुंबईत सर्व राज्यांच्या लोकांचं प्रतिनिधीत्व आहे. मुंबईकरांनी ते आनंदानं स्वीकारलं आहे. तेलुगू समाजाचं मुंबईत मोठं योगदान राहिलं आहे. राष्ट्रवादीत सर्व घटकांना स्थान आहे, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चालता यायला हवं, असा सल्ला शरद पवारांनी दिला.
राष्ट्रवादीला नव्या फळीची गरज
नवी तरुण पिढी आपल्या पक्षात तयार झाली पाहिजे. लोकांना बदल हवा असतो. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला लोकांमध्येही उत्साह असतो. त्यामुळे प्रत्येक स्तरावर आपल्या पक्षात चेहरे बदल झाले पाहिजेत, याकडे लक्ष द्यायला हवं. तसेच आपल्या कामाची पद्धतही बदलली पाहिजे. त्यासाठी सोशल मीडियाकडे प्रामख्याने फेसबुक, ट्विटर याकडे अधिक लक्ष देण्यास शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका आपल्या देशाचा पंतप्रधान काय तर भगवे वस्त्र पांघरुन गुहेत जाऊन बसला. यातून तुम्ही जगाला काय संदेश दिला. तरुणांना विज्ञानाची कास धरुन आधुनिकीकरणाकडे नेले पाहिजे, ते करायचं सोडून आमचे पंतप्रधान गुहेत जाऊन बसतात, अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. नरेंद्र मोदींनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादाला खतपाणी घातलं. पाकिस्तानचा मुद्दा पुढे केला. धार्मिक वातावरण तयार करुन त्याचा राजकीय फायदा घेतला. देशावर हल्ला होतो आणि त्यामागे पाकिस्तान असल्याचं प्रोजेक्ट केलं जातं, त्यावेळी इतर मुद्दे अंधारात टाकून राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणण्यात भाजप यशस्वी ठरले, असा आरोपही शरद पवारांनी केला.ईव्हीएम, व्हीव्हीपॅटवर शंका कायम
व्हीव्हीपॅटद्वारे मत कशावर गेलं हे कळतं. व्हीव्हीपॅटमुळे काही गडबड नाही हे कळलं, पण त्याच्यापुढे एक अधिकारी बसतो. तुमच्या व्हीव्हीपॅटच्या चिट्ठ्या जिथे मोजल्या गेल्या तिथे नक्की काय झालं त्याचा शोध घेणं गरजेचा आहे. तिथे गडबड आहे, असा संशय शरद पवारांना व्यक्त केला. व्हीव्हीपॅट मशीन दोनच कंपन्या तयार करतात. या मशिनसंबंधी तंत्रज्ञ, तज्ज्ञ यांची बैठक दिल्लीत बोलवणार आहोत. यावर एक्सपर्टचा सल्ला घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.