हायकोर्टात परमबीर सिंह प्रकरणात दोन स्वतंत्र याचिका; भ्रष्टाचाराबद्दल गुन्हा दाखल करत स्वतंत्र चौकशीची मागणी
कथित दरमहा शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. मात्र यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहयांच्या लेटरबॉम्बमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यातील हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची सीबीआय अथवा ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात करण्यात आली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या याचिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही प्रतिवादी करण्यात आले आहे.
राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. असा खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे. या आरोपामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या कथित दरमहा शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. मात्र यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. राजकीय दबावापोटी पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे याप्रकरणाची सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे तपास करण्याची मागणी करत फौजदारी याचिका जयश्री पाटील यांनी हायकोर्टात दाखल केली आहे.
परमबीर सिंह-अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार?
परमबीर सिंह यांनी पत्रात उल्लेख केलेल्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच सिंह पोलीस विभागाचे सर्वोच्च पदाचा कार्यभार वर्षभर सांभाळत होते आणि तरीही त्यांनी या प्रकारावर भाष्य अथवा कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्याही कामाचा तपास करण्यात यावा, अशी मागणीही पाटील यांनी याचिकेतून केली आहे. यासंपूर्ण प्रकरणात राज्याचे विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवून स्वतंत्र तपास यंत्रणेला तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी प्रमुख मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.
एनआयएला सापडलेली सचिन वाझेंची डायरी 100 कोटींची गुपितं उघडणार?
तर दुसरीकडे, खंडणी आणि मनसुख हिरण प्रकरणी गुन्हे शाखेचे निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याबाबतीत निष्काळजीपणा तसेच बेजबाबदारपणा दाखवल्याप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखी खाली स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करत एक स्वतंत्र याचिका हायकोर्टात सादर करण्यात आली आहे. ही फौजदारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी केली सादर आहे. सदर प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.























