परमबीर सिंह यांचं पत्र आताच का? यासह 'या' मुद्यांमुळं पत्रावर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांच्या या पत्रावर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
मुंबई : मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढत आपली बाजू मांडली असून आरोप सिद्ध करावेत अन्यथा परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र परमबीर सिंह यांच्या या पत्रावर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. यातील काही प्रश्न गृहमंत्री अनिल देशमुखांनी देखील आपल्या पत्रकात उपस्थित केले आहेत.
अनिल देशमुखांच्या पत्रकातील प्रश्न
1.सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही?
2.आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी दिनांक 16 मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंह हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?
3. सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
फेब्रुवारीत अनिल देशमुख नेमके होते कुठे?
राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चार फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांची तब्येत खराब झाली. त्या दिवशी कोरोना चाचणी केली. 5 तारखेला अनिल देशमुख रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. पाच तारखेला अनिल देशमुख नागपूर रुग्णालयात दाखल झाले. पाच ते सोळा फेब्रुवारी अनिल देशमुख हॉस्पिटल मध्ये होते. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर अनिल देशमुख 16 तारखेला संध्याकाळी मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर ते 26 तारखेपर्यंत आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर अधिवेशन 1 तारखेपासून होणार होतं म्हणून 26, 27,28 अनिल देशमुख यांनी ब्रिफिंग घेतलं. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या बोलण्यात की फेब्रुवारी महिन्यात अनिल वाझे यांना घरी बोलवले, भेट झाली यात किती तथ्य आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.