Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग, आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू
मुंबईत (Mumbai) गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 123 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Mumbai Corona Update : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) दैनंदिन कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात 71 पोलिसांचा समावेश आहे. नव्या 71 रूग्णांसह मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 9 हजार 510 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत मुंबईत 123 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 265 पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत.
कोरोनाची संख्या वाढत असताना पालिकेने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन होत आहे का? यासह राजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पाडत असतात. परंतु, ही जबाबदारी पार पाडत असताना कोरोनाची बाधा झाल्यामुळे आतापर्यंत 123 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
कडक निर्बंध लागणार का?
मुंबईतील दैनंदिन रूग्णसंख्या 20 हजारच्या पुढे गेली तर मुंबईत कडक निर्बंध लावण्याचे संकेत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. या आधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच आता ही वाढती रूग्णसंख्या पाहता मुंबईत कडक निर्बंध लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईकरांसाठी पुढचा आठडा महत्वाचा
मुंबईकरांसाठी पुढचा आठवडा जास्त काळजीचा आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबईत तिसरी लाट धडकली असून रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे रोज वाढणारी रुग्ण संख्या मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या























