चेंबूरचा अमर महल पूल 18 महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला
या वर्षीच्या मे महिन्यात या उड्डाणनपुलावरील एक बाजू खुली करण्यात आली होती. मात्र तरीही या मार्गावर ठाण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती.
मुंबई : चेंबूरचा अमर महल उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता. पुलावरील वाहतूक बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या समस्येचा सामना गेली वर्षभर करावा लागत होता.
या वर्षी मे महिन्यात या उड्डाणपुलावरील एक बाजू खुली करण्यात आली होती. मात्र तरीही ठाण्याहून मुंबईकडे आणि मुंबईहून ठाण्याकडे सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती. मात्र आजपासून पूल पूर्णत: खुला झाल्यानं नागरिकांना मोठा दिलास मिळाला आहे. अमर महल उड्डाणपूल 1995 च्या सुमारास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. भविष्यातील अवजड वाहनांची वाहतूक लक्षात घेऊन हा उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र पुलावरून 10 टन ऐवजी 25 टनापर्यंत अवजड वाहनांची वाहतूक होते. वाहतूक कोंडीमुळे ही जड वाहनं जास्त काळ पुलावर राहत असल्यानं हा पूल नादुरुस्त झाल्याचं सांगण्यात येत होतं.
पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी समिती नेमण्यात आली होती. माजी सार्वजनिक बांधकाम सचिव प्रमोद बंगिरवार हे त्या समितीचे अध्यक्ष होते.