coronavirus | मुंबईचा धोका टाळण्यासाठी धारावी लॉकडाऊन करा : खासदार राहुल शेवाळे
मुंबईवरील मोठे संकट रोखण्यासाठी धारावीत कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.धारावीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची लेखी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.
![coronavirus | मुंबईचा धोका टाळण्यासाठी धारावी लॉकडाऊन करा : खासदार राहुल शेवाळे MP Rahul Shewale demand for lockdown dharavi to cm uddhav thackeray due to coronavirus coronavirus | मुंबईचा धोका टाळण्यासाठी धारावी लॉकडाऊन करा : खासदार राहुल शेवाळे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/04221302/mumbai-slum.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने मुंबईतील काही विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. या पार्श्वभूमीवर धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
मुंबईवरील मोठे संकट रोखण्यासाठी धारावीत कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.धारावीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची लेखी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच, मुंबईला कोरोनाच्या मोठया संकटापासून वाचविण्यासाठी धारावीमध्ये आणखी काही कठोर उपाययोजना करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.धारावीतील प्रादुर्भाव वेळीच रोखला गेला नाही तर या परिसरावर आणि पर्यायाने मुंबईवर मोठे संकट येईल, असा इशाराही खासदारांनी दिला आहे.
Coronavirus | मुंबईतील कुर्ला, अंधेरीच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव
खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्रावरील कोरोनाचा धैर्याने आणि संयमाने सामना करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, दाट लोकसंख्येमुळे धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या संकटापासून धारावीला आणि पर्यायाने मुंबईला वाचविण्यासाठी राज्य सरकारने धारावीला पूर्णतः लॉकडाउन करण्यासोबतच मुंबई महानगरपालिकेने इथली सर्व रुग्णालये ताब्यात घेऊन कोरोना बाधितांसाठी राखीव करावीत. 'धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' चा वापर क्वारंटाईन वॉर्ड म्हणून करावा. संपूर्ण धारावीचे निर्जंतुकीकरण त्वरित करावे आणि इथल्या सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करावी. लॉकडाऊन काळात अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून स्वतंत्र शिधावाटप व्यवस्था आणि एक स्वतंत्र होम किचन सुरु करावे. लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाला धारावीत तैनात करण्यात यावे, अशीही मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.
याचबरोबर राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःला आणि संपूर्ण मुंबईला कोरोनापासून वाचविण्याचे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी धारावीतील जनतेला केले आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)