कार्यकर्त्यांमध्ये बळ भरण्यासाठी राज ठाकरेंचा नवा प्लॅन, गळती थांबणार का?
राज ठाकरे यांच्या पक्षाची मागील 16 वर्षातील परिस्थिती पाहिली तर नक्कीच ती समाधानकारक नाही. पक्षाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
मुंबई : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून स्वत:चा पक्ष स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाची गेल्या अनेक वर्षापासून स्थिती ढासळत चालल्याची चर्चा आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटतचं नाहीत अशीही चर्चा मागील काही वर्षात सातत्याने राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु राज ठाकरे यांच्या आगामी काळातील महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने कदाचित या सर्व चर्चांना कायमची खीळ बसण्याची शक्यता आहे. शिवाय सततच्या पराभवामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. या सर्वच प्रकारांना आळा बसण्यासाठी राज ठाकरे यांनी आता एक नवा प्लॅन तयार केल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरे यांच्या पक्षाची मागील 16 वर्षातील परिस्थिती पाहिली तर नक्कीच ती समाधानकारक नाही. पक्षाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या प्रमाण जास्त आहे. परंतु, आता कार्यकर्त्यांमध्ये बळ भरण्यासाठी राज ठाकरे यांनी एक नवा प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आणि मनसेला एक कुटुंब म्हणून उदयास आणणे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवली आहे.
गेल्या सहा महिन्या अधी राज ठाकरे यांनी हा प्लॅन बनवण्यास मुंबईतून सुरूवात केली. त्यासाठी मुंबईत नेत्यांची टीम बनवली. पक्ष वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? याचा आढावा घेऊन तपशील देण्याचे आदेश नेत्यांना दिले. त्यानुनसार नेत्यांनी दर एक महिन्यानंतर राज ठाकरे यांना अपला रिपोर्ट दिला. या नंतर राज ठाकरे यांनी विधानसभा विभागानुसार पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट करुन बैठक घेतली. त्यानंतर राजदूत, शाखाध्यक्षांची नेमणूक करुन त्यांना पुढचा कार्यक्रम दिला.
"राज साहेब यांनी पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सूचना दिल्या आहेत की, निवडणूक पाहून काम करु नका. सतत नव-नवीन काम करत राहा, जनतेशी संपर्क वाढवत राहा जेणेकरुन भविष्यात त्यांची साथ मतांमध्ये रुपांतरीत होईल. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की पुन्हा एकदा आम्ही उभारी घेऊ’ असा विश्वास ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.
"आगामी निवडणुकांत पक्षाची ध्येय धोरणे आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे राजदूत घरोघरी पोहचवणार आहेत आणि यासाठी शाखाध्यक्ष देखील मदतीसाठी असणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबद निवडणुकांमध्ये हेच राजदूत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील असा विश्वास पक्षाला आहे. त्याचं रिपोर्टिंग देखील थेट राज साहेबांना होणार आहे,’अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली.
‘राज ठाकरे यांच्या सभांना तूफान गर्दी असते पण त्याचं मतांमध्ये रूपांतर होत नाही. राज ठाकरेंनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय वाढवायला हवा, नेटवर्किंग मजबूत करायला हवं. राज यांचे पक्षासाठीचं रोड मॅप पण तेच म्हणत आहे. ज्याचा फायदा त्यांना निवडणूकींमध्ये होऊ शकतो’ असे मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
काय आहे राज ठाकरे यांचा नवा प्लॅन?
पक्षाची ध्येय धोरणे राजदूतांनी घरा- घरात पोहचवणे
लोकसभा आणि विधानसभा कार्यक्षेत्रासाठी जबाबदारी देण्यात आलेल्या नेत्यांनी वेळोवेळी रिपोर्ट सादर करणे
राजदूतांना आणि शाखाध्यक्षांचा कामातील उत्साह वाढवा यासाठी घरोघरी जाऊन वेग-वेगळ्या योजना राबविण्यासाठी कार्यक्रम देणे
मनसे कुटुंब आहे हा मेसेज देण्यासाठी दिवाळी पहाट या सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देणे
वेगवेगळ्या संस्था उभारून लोकसंपर्क वाढवण्यावर भर देणे
कसा तयार झाला हा सत्तेचा हा राज मार्ग …
राज ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली. पुन्हा सुरूवातीपासून वरपर्यंत योग्य लोकांना योग्य पदावर नेमणुकीसाठी राज ठाकरे यांनी आढावा बैठका घेतल्या.
संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी गटाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांवर काम सुरु केलं आहे. चांगले कार्यकर्ते, गटाध्यक्ष नेमले आणि त्यांना राजदूत असं नाव दिलं. तर चांगले शाखाध्यक्ष तयार करुन त्यांच्यावर योग्य जबाबदारी देण्यात आली.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद, भेटी गटी वाढल्या. थेट कार्यकर्त्यांशी संपर्क वाढला. त्यांना वेळोवेळी सूचना करणे, संवाद साधने, त्यांच्याकडून माहिती घेऊन पक्षासाठी योग्य निर्णय घेणे सुरु केले.
आगामी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राज ठाकरे यानी स्वत: पुण्यात लक्ष घातलं. मागील काही महिन्यात राज ठाकरे यांनी पुण्यात 8-9 दौरे केले. येथेही राजदूत, शाखाध्यक्षांच्या बैठका घेऊन नवीन नेमणुका केल्या.
नाशिक मध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे दौरे झाले आहेत. राज ठाकरे स्वत: चारवेळा नाशिकला गेले होते. अमित यांनी विधानसभा आणि वार्ड नुसार, सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधला आहे. अमित यांनी याचा राज ठाकरे यांना अहवाल दिला. त्यांनतर राज ठाकरे यांनी स्वत: आढावा घेऊन नवीन पदाधिकारी नेमले.
कार्यकर्त्यांना चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी काही स्कीम ही तयार केल्या आहेत. जो शाखाध्यक्ष चांगलं काम करेल त्याच्या घरी राज ठाकरे जेवायला जातील.
महाराष्ट्र सैनिक नावाचे बॅच तयार करुन स्वत: राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना वाटले आहेत.
नाशिक आणि नवी मुंबई मध्ये घरोघरी झेंडा कार्यक्रम घेतले गेले. ज्या मध्ये मनसे पदाधिकारी आणि समर्थक यांच्या घरी नेत्यांनी जाऊन झेंडा लावला तर त्यांच्याशी संवाद साधून संपर्क वाढवला.
दरम्यान, सुरुवातीच्या टप्प्यात विकासाची चर्चा करुन कार्यकर्ते पेटत नाहीत आणि मतंही मिळत नाहीत ही बाब लक्षात घेत राज ठाकरेंनी उत्तर भारतीय नावाचा शत्रू उभा केला. याचा परिणाम 13 आमदार, नाशिकचा महापौर मुंबईत 28 नगरसेवक आणि राज्यभरात 200 हून जास्त लोकप्रतिनिधी पाहिला मिळाले. परंतु नंतरच्या काळात यशाच्या धुंदीत असणाऱ्या राजठाकरेंना पक्षाची वाताहात कधी झाली हे लक्षातचं आली नाही.
2014 च्या निवडणुकीत मोदी त्सुनामीने मनसेला मोठा फटका दिला. त्यानंतरच्या काळात मात्र सातत्याने पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. यासाठी राज यांनी लाव रे तो व्हीडिओ म्हणत मोदींवर टीका देखील केली. परंतु ईडीच्या नोटीशीनंतर शांत झालेल्या मनसेची उरलीसुरली विश्वासार्हताही लयाला जाऊ लागली. त्यामुळेच राज ठाकरे यांनी हा नवा प्लॅन तयार केल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे 15 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. यामध्ये पुण्यात एक बैठक होईल आणि त्यानंतर औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, अमरावती आणि शेवट ठाण्यात होईल. या दौऱ्याच्या निमित्ताने राज यांनी कार्यकर्त्यांना बळ कशाप्रकारे देता येईल याचा सारासार विचार केल्याची चर्चा आहे.
इतर बातम्या
बदनामीसाठी सत्तेचा दुरूपयोग करत दबावतंत्रानं खोटा गुन्हा, आशिष शेलारांचा BMC महापौरांवर आरोप
IAF Chopper Crash : कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या जागी सापडला ब्लॅक बॉक्स, उलघडणार अपघाताचे रहस्य