एक्स्प्लोर
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राम कदमांचा महिला आयोगासमोर बिनशर्त माफीनामा
या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. महिला आयोगानेही स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपलं म्हणणं आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते.

मुंबई : मुली पळवण्याच्या वक्तव्याविषयी भाजपचे आमदार राम कदम यांनी आपला खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केला. त्यानुसार त्यांनी आयोगापुढे बिनशर्त माफी मागितली. भविष्यात महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी कार्यरत राहण्याची हमीही त्यांनी महिला आयोगासमोर दिली. राम कदम यांच्या या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना राम कदम यांनी मुली पळवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. महिला आयोगानेही स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपलं म्हणणं आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राम कदम यांनी आयोगाकडे लेखी खुलासा सादर केला. राम कदम यांचं आक्षेपार्ह वक्तव्य "कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले होते.
आणखी वाचा























