एक्स्प्लोर
मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान
संध्याकाळनंतर मीरा-भाईंदरमधल्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार असून त्यानंतर गुप्त प्रचाराला सुरुवात होणार आहे.

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे. ही निवडणूक भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह बविआ सारख्या स्थानिक पक्षांसाठीही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. 20 ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शुक्रवारी संध्याकाळनंतर मीरा-भाईंदरमधल्या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्यानंतर गुप्त प्रचाराला सुरुवात होईल. मिरा भाईंदरमध्ये सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. 24 प्रभागातल्या 95 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल 21 ऑगस्टला लागणार आहे. मिरा-भाईंदरच्या निवडणुकीत भाजपने एकूण 95 पैकी 93 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यात 57 उमेदवार हे गुजराती, जैन, मारवाडी, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असून उरलेले सगळे मराठी उमेदवार आहेत. विशेष म्हणजे भाजपने राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेतून आलेल्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या 25 उमेदवारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर शिवसेनेचे हरीश अग्रवाल हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 67 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 22 उमेदवार अशिक्षित असून 117 उमेदवार फक्त दहावी पास आहेत. निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे शिवसेनेचं पारडं जड असलं तरी भाजपनंही तगड्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात बविआ सारखे स्थानिक पक्ष काय कामगिरी करतात हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. दुसरीकडे, मिरा भाईंदर निवडणुकीतील मतदार यादीत घोळ असून भाजप खोट्या मतदारांच्या जीवावर सत्ता आणणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आणखी वाचा























