(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? या राजकीय चर्चेचं नेमकं कारण काय?
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. या अफवा नेमक्या का उठत आहेत आणि कोण उठवत आहे?
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात सुरु आहे. दिल्ली निवडणुकीनंतर फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरच्या एका मोठ्या संघटनात्मक पदाची जबाबदारी किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशी कुठलीही चर्चा ही निव्वळ अफवा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी बोलतांना स्पष्ट केलं.
मात्र प्रश्न उरतो की नेमक्या या वावड्या कोण आणि का उठवत आहे? महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर राज्यातील प्रदेश भाजपात मोठे संघटनात्मक फेरबदल होणार असल्याचे संकेत केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची सूत्रांची महिती आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली मतांची टक्केवारी आणि पॅटर्नच्या आधारावर सध्या चिंतन सुरू आहे. यासंदर्भातील अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवला जाणार आहे. त्या आधारावर पक्षातील पदांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्लीच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र भाजपात संभाव्य फेरबदल पाहायला मिळतील.
फडणवीस यांच्या दिल्लीत जाण्याच्या वावड्या का उठत आहेत?
- केंद्रात एका पाठोपाठ एक अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रीकर यांच्यासारख्या अभ्यासू आणि क्लीन इमेज असलेल्या नेत्यांच्या अकाली निधनाने टीम मोदीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. ती पोकळी भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जात आहे.
- 'केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' या नाऱ्याला फडणवीस सरकारने राज्यात तंतोतंत अमलात आणलं. त्यानुसार सरकारची संपूर्ण सूत्र ही एकट्या मुख्यमंत्र्यांनी हाती घेतली. या कार्यपद्धतीमुळे अनेक ज्येष्ठ नेते आणि सहकारी दुखावले गेले तर काहींनी डावललं गेल्याची भावना जाहीर कार्यक्रमातून व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेच्या धक्क्यानंतर राज्यात सत्ता गेल्याचं खापरही एकट्या देवेंद्र फडणवीसांवर फोडलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात देवेंद्र फडणवीस विरहित भाजप पुनरप्रस्थापित करण्यासाठी पक्षातील नाराज नेत्यांचा गट सक्रिय झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- तर शिवसेनेला पुन्हा चुचकरण्याचा प्रयत्न करुन सत्ता मिळवायची असेल तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ताणले गेलेले संबंध मोठा अडथळा ठरू शकतात याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय संघटनेचा चेहरा करून राज्यातील सूत्र इतर नेत्यांवर सोपवण्याचा पर्यायही चोखाळला जातोय.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून मोदींनी केलेल्या प्रयोगामुळे गेल्या पाच वर्षात राज्याचं समाजकारण ढवळून निघालं. मराठा, धनगर, आदिवासी, ओबोसींसह शेतकऱ्यांचे मोर्चे निघाले. भीमा-कोरेगाव सारख्या दंगली उसळल्या. मात्र फडणवीस सरकारने या सगळ्याचा सामना करत मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफीसारखे ऐतिहासिक निर्णय घेतले. तरीही निवडणुकीनंतर समोर आलेल्या मतांच्या आकडेवारीनुसार या निर्णयाचा म्हणावा तसा परिणाम निकालात पाहायला मिळाला नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा मराठा किंवा बहुजन चेहरा समोर आणायचा का याबाबत सध्या भाजपच्या कोअर ग्रुपमध्ये खलबतं सुरू आहेत.
असं असलं तरी राज्यात अजूनही विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा कायम आहे. इतर पक्षातून भाजपात आलेले अनेक दिग्गज नेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपात आलेले आहेत. भाजपच्या फेरबदलात फडणवीस यांना दिल्लीत पाठवले तर या नेत्यांची मोठ्या प्रमाणात घरवापसी होण्याची शक्यता आहे. तसेच फडणवीस यांची उचलबांगडी तर राज्यात भाजपने नैतिक पराभव मान्य केल्याचा मेसेज जाईल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चिंतन-मंथनातून भाजप राज्यात कसा कमबॅक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
संबंधित बातम्या
अबब... फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात 15 कोटी 51 लाख रुपयांचा जाहिरात खर्च
प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याचे प्रकरण, देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
जलयुक्त शिवार योजना बंद करू नका; देवेंद्र फडणवीसांचं सरकारला आवाहन