'शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे!' फेसबुक पोस्ट करत भाजप पदाधिकाऱ्यांकडून डिवचण्याचा प्रयत्न
Maharashtra Political Crisis : भाजप मुंबई महिला मोर्चाच्या शीतल गंभीर देसाई यांनी फेसबुक पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांचा शिवसेना प्रमुख म्हणून उल्लेख केला आहे.
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या. मात्र अजून या राजकीय पटावर भाजपची म्हणावी अशी एन्ट्री झालेली नाही. यात एका भाजप पदाधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.
भाजप मुंबई महिला मोर्चाच्या शीतल गंभीर देसाई यांनी फेसबुक पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांचा शिवसेना प्रमुख म्हणून उल्लेख केला आहे. या पोस्टवर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला जात आहे. यावर शिवसेना कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. शीतल गंभीर देसाई या माहिमच्या नगरसेविका आहेत. त्या भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अद्याप काही प्रतिक्रिया आलेली नाही.
शीतल गंभीर देसाई यांनी फेसबुकवर एक ग्राफिक्स शेअर केलंय. त्यामध्ये शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन असा मजकूर लिहिला आहे. यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर भाजपकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह सूरत तसेच गुवाहाटीमध्ये देखील भाजपचे पदाधिकारी दिसून आले आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याची अट उद्धव ठाकरेंसमोर ठेवली होती. या बंडानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 37 आमदारांसह एकूण 46 आमदार असल्याचं बोललं जात आहे. तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या