Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा नारा दिला जात आहे. आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल, असा हल्लाबोल केला होता.
मुंबई : पुण्यातल्या खडकवासलामधल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवत महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला. व्होट जिहादचा नारा दिला जात आहे, आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल, असं फडणवीस म्हणाले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहीयेत. हा महाराष्ट्र आहे. मतदाराला भारतीय संविधानाने दिलेल्या मताचा अधिकार आहे. ते आपलं मत त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात. भारतीय जनता पक्षाचा लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही. त्यांना संविधान बदलायचे आहे. तुम्ही मतदारांवर पद्धतीने दबाव आणत आहात. गोंधळ निर्माण करत आहात. देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे धर्मयुद्ध आहे. हे धर्मयुद्ध असेल तर हा महाराष्ट्र धर्मयुद्ध आहे. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध सुरु आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
राऊतांचं फडणवीसांना आव्हान
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणताय आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकवू. त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? पाकिस्तानावर तिरंगा फडकावण्याचं सोडून द्या. आधी पाकव्याप्त काश्मीर तुमचे नेते गेल्या 10 वर्षापासून घेत आहेत. तिथे जाऊन तिरंगा फडकावून दाखवा. मणिपूरला जाऊन तिरंगा फडकावून दाखवा, असे आव्हान देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.
देवेंद्र फडणवीसांना उपचाराची गरज
महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाकिस्तान, बांगलादेश, बटेंगे तो कटेंगे, हे चाललंय तरी काय? तुम्ही महाराष्ट्रात निवडणूक लढत आहात. कसलं व्होट जिहाद? एखाद्या समाजाने कोणाला मत द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. 2014 च्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने मोदींना मत दिले. मग तो व्होट जिहाद समजायचा का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यांचा जो मानसिक गोंधळ होत आहे त्याविषयी आम्हाला चिंता वाटते. 23 तारखेच्या निकालानंतर हा गोंधळ अधिक वाढणार आहे. त्यांना कोणत्या प्रकारचे आजार जडतील, याविषयी मला चिंता वाटते. देवेंद्र फडणवीस यांना उपचाराची गरज आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
आणखी वाचा