What Is Accidental Black Spot: वाहन अपघातात जीवघेणा ठरणारा ब्लॅक स्पॉट म्हणजे काय? जाणून घ्या
What Is Accidental Black Spot: उद्योजक सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर ब्लॅक स्पॉटची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घ्या, हा ब्लॅक स्पॉट म्हणजे असतो तरी काय?
What Is Accidental Black Spot: देशातील महत्त्वाचे उद्योजक सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी अपघातात दुर्देवी निधन झाले. मिस्त्री यांच्या कारचा अपघात झालेले ठिकाण हे ब्लॅक स्पॉट (Black Spot) असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट असल्याचे म्हटले जाते. मात्र, हा ब्लॅक स्पॉट म्हणजे काय, (know about black spot) जाणून घेऊयात.
महामार्ग अथवा रस्त्यावरील विशिष्ट ठिकाणी सातत्याने अपघात होतो त्या भागाला ब्लॅक स्पॉट म्हटले जाते. या ठिकाणी अपघाताची काही विशिष्ट कारणे असू शकतात. यामध्ये रस्त्यावर मोठे वळण असणे, सरळ मार्गावर तीव्र उतार असणे, सरळ असणाऱ्या मार्गावर अचानकपणे वळण येणे आदी कारणांचा समावेश करता येईल. अशा वेळी वाहन अपघाताची शक्यता अधिक असते. हे अपघात जीवेघेणे ठरतात. एकाच ठिकाणी तीन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जीव गेला. तर त्या जागेला 'ब्लॅक स्पॉट' म्हटले जाते.
महाराष्ट्रात किती ब्लॅक स्पॉट ?
'टाइम्स ऑफ इंडिया'ने जानेवारी महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात 1324 ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात होण्याची ठिकाणे आहेत. यामधील 628 ब्लॅक स्पॉट हे रस्ते वाहतूक आणि महामार्गाने अधोरेखित केले आहेत. तर, 381 ब्लॅक स्पॉट हे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि 315 ब्लॅक स्पॉट हे स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधोरेखित केले आहेत. या ठिकाणी वारंवार अपघात घडले आहेत.
राज्यात 1324 ब्लॅक स्पॉटपैकी 931 ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना आखण्यात आली आहे. तर, 359 ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना आखण्यात आल्यात.
ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी अपघात प्रवण ठिकाण असल्याचा इशारा देणारे फलक लावणे, सांकेतिक चिन्हांचे बोर्ड लावणे, वेग मर्यादा लागू करणे आदी उपाय योजना आखल्या जातात. त्याशिवाय, ब्लॅक स्पॉट असणाऱ्या ठिकाणाजवळील रुग्णालयात अपघातातील जखमींवर उपचार होतील अशी व्यवस्था असणे अपेक्षित असते. वाहन चालकांनीदेखील वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहन चालवावे असे आवाहन वारंवारपणे केले जाते.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर 29 ब्लॅक स्पॉट
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून महाराष्ट्र बॉर्डरवरील अछाड ते घोडबंदर अशा 118 किलोमीटरच्या पट्ट्यात 29 ब्लॅक स्पॉट असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. 2014-15 मध्ये याच ब्लॅक स्पॉटची संख्या साधारण 82 होती. त्यानंतर ती कमी होऊन 29 वर आली. मात्र अजूनही अपघातांच्या संख्येमध्ये कमी होताना दिसून येत नाही. वर्षभरात साधारणत: चारशेच्या आसपास बळी गेल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे.
तीन लेन्स अचानक दोन लेनमध्ये बदलतात!
ज्या ठिकाणी सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला. तो सुद्धा ब्लॅक स्पॉट असून चारोटीचा उड्डाणपूल उतरताच वाहन वेगाने येतात. हा पूल उतरताना तीन लेन आहेत. त्या तीन लेन्सचं अचानक दोन लेनमध्ये रूपांतर होतं आणि त्यावेळेस वाहनचालकांचा गोंधळ उडतो. या पुलाला थेट सूर्य नदीच्या पुलाचा कठडा बाहेर निघालेला आहे. त्याला धडक बसते. अशाच प्रकारे हा अपघात झाला असून या अगोदरही येथे काही अशाच प्रकारे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्येही काहींना प्राण गमवावा लागले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: