Aryan Khan Drug Case : किरण गोसावी फ्रॉड, त्यानेच समीर वानखेडेंच्या नावाने डील केली; सॅम डिसूझाचा गंभीर आरोप
Aryan Khan : आर्यन खान निर्दोष असून त्याला मदत करण्यासाठी किरण गोसावीने आपल्याशी संपर्क साधला, त्याने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केला असा गंभीर आरोप सॅम डिसूझाने केला आहे.
मुंबई : किरण गोसावी हा फ्रॉड माणूस असून आर्यन खान प्रकरणात त्याने समीर वानखेडेंच्या नावाने डील केली, त्याने प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह केला आणि आपल्याला मध्यस्ती करण्याची विनंती केल्याचा गंभीर आरोप सॅम डिसूझा याने केला. सॅम डिसूझाने एबीपी माझाशी बोलताना हा गौप्यस्फोट केला.
मी फक्त मध्यस्ताचं काम केलं, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं सॅम डिसूझाने सांगितलं. आर्यन खान प्रकरणात साईल प्रभाकर यांनी सॅम डिसूझावर पैशाची डील केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता स्वत: सॅम डिसूझाने यावर खुलासा केला.
सॅम डिसूझा एबीपी माझाशी बोलताना म्हणाला की, "आर्यन खान निर्दोष असून त्याला मदत करायला हवी असं किरण गोसावी म्हणाला. त्यामुळे आपण या प्रकरणात मध्यस्ती करण्याची तयारी दर्शवली. मी किरण गोसावीला हवे असलेले कॉन्टॅक्ट करुन दिल्यानंतर त्याने पुढची चर्चा करताना मला बाजूला ठेवले आणि 50 लाखांची टोकन अमाऊंट घेतली."
किरण गोसावीने प्रभाकर साईल याचा नंबर समीर वानखेडे यांच्या नावाने सेव्ह केला. ट्रू कॉलरवर चेक केलं असता तो प्रभाकर साईलचा असल्याचं समोर आलं आणि हे प्रकरण फ्रॉड असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे टोकन अमाऊंट म्हणून घेतलेले 43 लाख रुपये परत किरण गोसावीला मी परत करायला सांगितलं.
सॅम डिसूझा म्हणाला की, "किरण गोसावीने आर्यनचा व्हॉईस कॉल रेकॉर्ड केला. 'पापा, आयएम अॅट एनसीबी' असं आर्यनने त्यामध्ये बोललं होतं. त्यानंतर हा मोबाईल घेऊन किरण गोसावी एनसीबी ऑफिसच्या बाहेर आला. त्या ठिकाणी मी, किरण गोसावी, पूजा ददलानी आणि चिकी पांडे होतो. त्यानंतर ही किरण गोसावीने पैशाची डील केली "
संबंधित बातम्या :
- Exclusive Aryan Khan Drug Case : शाहरुख आणि NCB मध्ये 25 कोटींची कथित डील कशी झाली? सॅम डिसूझांचा खळबळजनक गौप्यस्फोट
- Kiran Gosavi : पैसे परत मागितल्यावर बंदूक दाखवून धमकावलं, किरण गोसावीवर पुण्यात तिसरा गुन्हा दाखल
- ही लढाई एनसीबी विरोधात, क्रांती रेडकरांच्या विरोधात नाही, राज्यात सगळेच मराठी : संजय राऊत