Kiran Gosavi : पैसे परत मागितल्यावर बंदूक दाखवून धमकावलं, किरण गोसावीवर पुण्यात तिसरा गुन्हा दाखल
किरण गोसावी (Kiran Gosavi) सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. या आधी त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे : बहुचर्चित ड्रग्स पार्टी प्रकरणातील प्रमुख पंच असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) समोरच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. त्याच्या विरोधात आता पुण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे परत मागण्यास गेलेल्या तरुणाला किरण गोसावीने बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात किरण गोसावी, त्याची एक सहकारी आणि किरण गोसावीचा मालक या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 48 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
किरण गोसावीने संबंधित व्यक्तीला परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. 55 हजार रुपये पगार मिळेल असे खोटे आश्वासन देखील त्यांना दिले होते. तर व्हिजा, हॉटेल बुकिंग आणि इतर सुविधा मिळवून देण्यासाठी फिर्यादीकडून एकूण 1 लाख 45 हजार रुपये घेतले. मात्र त्यांना नोकरी लावली नाही. त्यांना परदेशात जाण्यासाठी अडचणी निर्माण केल्या.
त्यानंतर फिर्यादी हे किरण गोसावीच्या कार्यालयात पैसे परत मागण्यास गेले असता त्याने पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावले. ही घटना नोव्हेंबर 2018 ते 2021 या कालावधीत घडली असल्याची नोंद करण्यात आली आहे.
किरण गोसावी सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. या आधी त्याच्यावर फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल असून त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किरण गोसावी विरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.
प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणातील पंच आहे. तर दुसरा पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. प्रभाकर साईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता.
महत्वाच्या बातम्या :