एक्स्प्लोर
मुंबईतील 14 वर्षांच्या बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी
मुंबईतील मानखुर्दमधील अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केला होता. यातून गर्भवती राहिलेली तरुणीच्या पोटात 24 आठवड्यांचा गर्भ होता. एमटीपी कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही.

मुंबई : 14 वर्षांच्या बलात्कार पीडित अल्पवयीन तरुणीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. तरुणीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठाने 24 आठवड्यांच्या या गर्भवती अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. मानखुर्दमधील अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने बलात्कार केला होता. सदर आरोपीला पॉस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. ही मुलगी 24 आठवड्यांची गर्भवती असून एमटीपी कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. गर्भपाताची परवानगी मिळावी म्हणून पीडित मुलीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सदर मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला. हायकोर्टाने याची दखल घेत पीडित अल्पवयीन मुलीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये, म्हणून सदर मुलीला गर्भपात करण्याची परवानगी देत ही याचिका निकाली काढली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























