(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यास हरकत नाही; राज्य सरकारची न्यायालयात भूमिका
Govind Pansare : कॉ. पानसरे हत्या प्रकरणातलं अपयश हे एकट्या एसआयटीचं नसून सीबीआय, एनआयएसह शेजारील राज्यातील पोलीसही आरोपींच्या शोधात असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली.
मुंबई: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करण्यास कोणताही हरकत नाही अशी भूमिका सोमवारी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडून हायकोर्टात मांडण्यात आली. एसआयटीची संपूर्ण रचना बदलून कोणता हेतू साध्य होईल? शेवटी, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा तुमचा हेतूही असायला हवा असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं. तसेच एटीएसला हे प्रकरण हस्तांतरित केल्यास, इतक्या वर्षांनंतरही त्यांना हा तपास नव्यानंच सुरू करावा लागेल. तेव्हा एसआयटीचा एखादा अधिकारी एटीएसमध्ये सामील होऊ शकतो का? जेणेकरून तपासाचा बराचसा वेळ वाचू शकेल. याबाबत सूचना घेण्याचे निर्देश राज्य सरकारला देत सुनावणी 3 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.
अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये तर 16 फेब्रुवारी 2015 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोल्हापूरातील या प्रकरणाच्या तपसा करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. मात्र इतकी वर्ष तपास करूनही एसआयटीच्या हाती काहीच लागलेलं नाही, त्यामुळे एसआयटीच्या तपासबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास अन्य तपासयंत्रणेकडे देत न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. त्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. पानसरेंच्या हत्येला आता सात वर्ष लोटली असून तपासात काहीच प्रगती होत नसल्याचं पानसरे कुटुंबियांच्यावतीनं हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा, एटीएस ही राज्य सरकारचीच तपास यंत्रणा असल्यानं तपास हस्तांतरित करण्यास आमची हरकत नाही असं राज्य सरकारच्यावतीनं जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी सांगितलं.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात एटीएसकडून प्रगतीपथावर होता. साल 2020 मध्ये औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात महाराष्ट्र एटीएसनं वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली होती. पानसरे प्रकरणातील फरार आरोपी सचिन अंदुरे आणि विनय पवार हेच पानसरे शूटर असल्याचं चौकशीदरम्यान उघड झाल्याचं पानसरे कुटुंबीयांच्यावतीनं अँड. अभय नेवगी यांनी सांगितलं. त्यावर या सर्व प्रकरणांत एक समान धागा असून याचिकाकर्ते एसआयटी आणि सीबीआयला दोष देत असून ओळख पटलेल्या शूटर्सचा अद्याप शोध लागलेला नाही. सीबीआय, एनआयए, आणि शेजारच्या राज्यांचे पोलीस मिळून सर्व तपासयंत्रणा, त्यांच्या शोधात आहेत त्यामुळे हे एकट्या एसआयाटीचं अपयश नाही, असंही मुंदरगी यांनी स्पष्ट केलं.