(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वांद्रे MTNL इमारतीतील आग विझवण्यात फायर रोबो अपयशी, एक कोटींचा धूर
अपेक्षेप्रमाणे ज्याठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी जाऊन रोबोनं आग विझवली पाहिजे होती. मात्र रोबोला जिनाच चढता न आल्याने मुंबईकरांच्या पैशांचा धूर झाला असच म्हणावं लागेल.
मुंबई : मुंबईतील आगीच्या घटनांचं वाढतं प्रमाण आणि दाटीवाटीचा परिसर या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आग विझवण्यासाठी मुंबई महापालिकेनं एक कोटींचा रोबो खरेदी केला. ज्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहचू शकत नाही, त्या ठिकाणी पोहचून हा रोबो आग विझवणार होता. मात्र आज मुंबईतील एमटीएनएल इमारतीला लागलेली आग विझवताना हा रोबो अपयशी ठरल्याचं दिसून आलं.
अपेक्षेप्रमाणे ज्याठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी जाऊन रोबोनं आग विझवली पाहिजे होती. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. आग विझवण्यासाठी हा रोबो जिन्याने निघाला होता. मात्र सुरुवातीलाच तो पायऱ्यावरच अडखळला. रोबोला जिनाच चढता न आल्याने मुंबईकरांच्या पैशांचा धूर झाला असच म्हणावं लागेल.
आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जवान या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. मात्र अग्निशमन दलातील हा रोबो आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ, चिंचोळ्या गल्ल्या, बेसमेंटची आग अशा ठिकाणी थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकतो.
या रोबोवर कॉम्प्युटरच्या माध्यमातून सूचना देऊन काम करुन घेतले जाणार आहे. रोबोच्या क्षमतेमुळे हा रोबो अडगळीच्या ठिकाणी जाऊन आग विझवू शकणार असल्यामुळे आग भडकण्याचे प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे.
कसा आहे फायर रोबो?
- फायर रोबो सीआयटीआयसी, आरएक्सआर-एम 80 जेडी नमुन्याचा रोबो आहे.
- रोबोची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी टाटा एस सुपरमिंट बनावटीचे 1 टन वजन उचलण्याची क्षमता असलेले सुसज्ज वाहन आहे.
- रोबोटला वाहनावर चढवणे व उतरवणे यासाठी एक हायड्रोलिक लिफ्ट आहे.
- या रोबोचा अतिज्वलनशील ठिकाणी वापर होतो.
- मुंबईत पेट्रोकेमिकल कारखाने किंवा अणुऊर्जा संशोधन केंद्र या ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्यास मोठा धोका आहे. अशा अतिज्वलनशील ठिकाणी या रोबोटचा वापर होऊ शकतो.
- रोबोवर महापालिकेचा एक कोटी 12 लाख रुपये खर्च.
- रोबोमध्ये आगीच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवेश करुन आग विझवण्याची यंत्रणा आहे.