Shinde vs Thackeray: व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा; शिंदे गटाकडून हायकोर्टात याचिका, आज सुनावणी
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या 13 याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case : मुंबई : आमदार अपात्रतेबाबतच्या (Shiv Sena MLA Disqualification Case) याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेल्या निकालाला शिंदे गटाकडून (Shinde Group) हायकोर्टात (HC) आव्हान देण्यात आलं आहे. शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आमदारांविरोधात दाखल केलेल्या 13 याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे. शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही? व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करत शिंदे गटानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज या याचिकेवर उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडणार आहे.
ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरी यांना अपात्र करा, अशी मागणी भरत गोगावलेंनी याचिकेतून केली आहे. आज सकाळच्या सत्रातच शिंदे गटाच्या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार आहे.
शिंदे गटाची मागणी नेमकी काय?
शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला गोगावलेंच्या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे. शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्यानं ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात दोन्ही गट न्यायालयात
साधारणतः आठवडाभरापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय दिला. यामध्ये शिवसेना पक्ष शिंदेंचा असल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलं. तसेच, याप्रकरणी निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांतील कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही. या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी न्यायालयाची दारं ठोठावली आहेत. सर्वात आधी ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यापाठोपाठ शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली.
शिवसेना शिंदेंचीच, ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील आपला निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचं सांगत ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवलं नाही.