कोरोनाची दुसरी लाट खरोखरच येईल का?
कोरोनाची संभाव्य दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पूर्वतयारी करुन ठेवण्याचे आदेश राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत. मात्र खरोखरच कोरोनाची लाट येईल का? यावर मात्र ठोस कुणीच उत्तरे देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : सध्या दिवाळीच्या या आनंदाच्या वातावरणात दर दिवशी प्रसारमाध्यमात बातम्या येत आहे, कोरोनाच्या सावटाखाली असलेली यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करा. कारण कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराची संभाव्य दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पूर्वतयारी देखील करुन ठेवण्याचे आदेश राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिले आहेत. दिवाळी सणानिमित्त खरेदीकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे. मात्र खरोखरच कोरोनाची लाट येईल का? यावर मात्र ठोस कुणीच उत्तरे देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील जनतेला यंदाची दिवाळी साधेपणाने करण्याचे आवाहन केले आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात होती. अनेक रुग्णांना बेड्स मिळवण्याकरता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र मागच्या चार-पाच आठवड्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर नवीन रुग्ण निर्माण होण्याची संख्येत लक्षणीय घट झाली. मृतांच्या संख्येचा आकडाही बऱ्यापैकी कमी झाला होता. राज्यातील प्रमुख शहरात ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती, त्या सर्वच शहरांची स्थिती सुधारत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने स्थिती उत्तम होत असून नागरिकांच्या मनातली कोरोनसंदर्भातील भीती कमी झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत.
तर दुसऱ्या बाजूला शहरातील मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे यांना कोरोनाची लाट येण्याची शक्यता दाट वाटते. ते सांगतात की, "ज्या पद्धतीने रस्त्यावर गर्दी पाहावयास मिळत आहे, बहुदा प्रमाणात संसर्ग हा होणारच आहे. त्यामध्ये तरुणांना धोका नसला तरी ते लक्षणविरहित रुग्ण होऊ शकतात त्यांना त्याचा फारसा त्रास होणार नाही. मात्र घरी आल्यावर त्यांच्या संपर्कातील वयस्कर आणि वृद्ध व्यक्तींना याचा निश्चित त्रास होऊ शकतो. त्यातच सध्याचे हवामान हा एक मोठा घटक आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात 10 अंश सेल्सिअस फरक पाहावयास मिळत आहे. या अशा तापमानात थकवा मोठ्या प्रमाणात येतो, प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे सुद्धा या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. मात्र या लाटेचे प्रमाण किती मोठे असेल हे आताच सांगणे कठीण आहे."
कोरोनाची स्थिती दिवाळीनंतर कशी असेल याबाबत कुणीही अनुमान व्यक्त करत नसले तरी वैद्यकीय तज्ञांनी यंदाच्या दिवाळीत काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असून अनेक ठिकणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती पाहता राज्यातील आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात पूर्वतयारी करुन ठेवली आहे. मुंबई महापालिकेने सुद्धा कोविडची सर्व रुग्णालये आहे तशीच सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Corona Second wave | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता;राज्य सरकारची तयारी पूर्ण : राजेश टोपे