(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची गरज नाही, बीएमसीचे सुधारित आदेश लागू
कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यास महापालिकेच्या विभागस्तरीय 'वॉर रुम'द्वारे बेड अलॉअमेंट करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णावर पूर्वीच्या तुलनेत अधिक लवकर वैद्यकीय औषधोपचार करणे शक्य होणार आहे.
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच डॉक्टरांच्या 'प्रिस्क्रीप्शन' शिवाय कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे आता बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील निर्धारित खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कोविड विषयक चाचणी ही थेटपणे संपर्क साधून करवून घेता येणार आहे. यानुसार खाजगी प्रयोगशाळांमधून चाचणी करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले दर लागू असतील, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्यासाठी यापूर्वी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असणे गरजेचे होते. मात्र ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांची कोविड विषयक चाचणी सहजपणे करवून घेणे शक्य होणार आहे. सदर चाचणी पॉजिटिव्ह आल्यास महापालिकेच्या विभागस्तरीय 'वॉर रुम'द्वारे बेड अलॉअमेंट करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णावर पूर्वीच्या तुलनेत अधिक लवकर वैद्यकीय औषधोपचार करणे शक्य होणार आहे.
महापालिका क्षेत्रातील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधून कोविड विषयक चाचणी करण्यासाठी शासनाने यापूर्वी लागू केलेल्या निर्धारित दरांनुसार प्रती चाचणी रुपये 2 हजार 500 एवढे शुल्क आकारले जाणार आहे. तर वैद्यकीय चाचणीसाठीचे नमूने हे संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन घेतल्यास त्यासाठी प्रती चाचणी रुपये 2 हजार 800 एवढे शुल्क आकारले जाणार आहे.
त्याचबरोबर संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांची कोविड विषयक वैद्यकीच चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) येणे आवश्यक आहे. याचाच अर्थ, कोविड विषयक चाचणी नकारात्मक आल्याशिवाय रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणातून डिस्चार्ज दिला जाणार नाही, असंही महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळवण्यात आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या