(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दहिसरमध्ये सेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई, आमदार मनीषा चौधरी मनपा अधिकाऱ्यांवर भडकल्या
भाजप-शिवसेना दोन्ही पक्षांनी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वेळी भूमिपूजन केले. मात्र, हे भूमिपूजन झाल्यानंतर मनीषा चौधरी यांनी संताप व्यक्त करत महापालिका अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
मुंबई : दहिसरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये युतीचे गोडवे गायले जात असताना दुसरीकडे मात्र आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते जनतेचे प्रश्न सोडवताना आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत.
दहिसर पश्चिमेला असलेल्या गणपत पाटील नगरमध्ये पाईप लाईनच्या कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम सोमवारी दोन्ही पक्षांकडून आयोजित करण्यात आला होता. एकीकडे भाजप स्थानिक आमदार मनिषा चौधरी यांनी मी सर्व पाठपुरावा करुन, परवानगी घेऊन स्थानिकांना पाणी मिळावं, यासाठी प्रयत्न केले असं सांगितलं. आमच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आम्ही भूमिपूजन करत असल्याचं मनीषा चौधरी यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे या ठिकाणी 'घर घर पाणी कनेक्शन का सपना साकार' म्हणत शिवसेना नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी या कामाचं श्रेय घेतलं. पाईप लाईनचं काम आमच्या प्रयत्नांनी झालं असून महापालिकेच्या मदतीने हे काम होणार आहे. त्यामुळे श्रेय आणखी कोण घेत असेल तर याबाबत मला माहित नाही, असं घोसाळकर यांनी भाजप आमदार मनिषा चौधरींना सुनावलं. त्यांनी म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन केलं.
अशारीतीने भाजप-शिवसेना दोन्ही पक्षांनी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वेळी भूमिपूजन केले. मात्र, हे भूमिपूजन झाल्यानंतर मनीषा चौधरी यांनी संताप व्यक्त करत महापालिका अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. आपण या ठिकाणी मला न बोलावता भूमिपूजन करुन राजकारण केल्याचा आरोप त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर केला.
त्यामुळे भाजप-शिवसेना युती जरी विधानसभेच्या निवडणुकांसाठी झाली, तरी पुन्हा एकदा सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवताना पुन्हा एकदा श्रेयवादाचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.