राजकीय स्वार्थासाठी सीबीआयचा बळी घेऊ नये, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा
केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबई : कोलकात्यामधील हायहोल्टेज ड्राम्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पत्रक जारी करुन आपली भूमिका मांडली. राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर केली.
"राज्य सरकारला विश्वासात न घेता, सीबीआयने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर छापेमारी केली. सीबीआयची स्वायत्तता संपुष्टात यावी यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जे प्रकार केले ते देशाने पहिले. मात्र नरेंद्र मोदींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करू नये", अशा शब्दात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
"आपला देश संघराज्य आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही हे भाजप सरकारने विसरू नये. केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो", असं राज ठाकरे म्हणाले.
#SaveDemocracy ...केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात मा. ममता बॅनर्जी ह्यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो. @MamataOfficial pic.twitter.com/tS0EonjYQj
— Raj Thackeray (@RajThackeray) February 3, 2019
काय आहे प्रकरण?
रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन सीबीआयने कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला. मात्र पश्चिम बंगाल पोलिसांनी छापा मारणाऱ्या सीबीआयच्या सहा अधिकाऱ्यांनाच अटक करुन पोलीस स्टेशनमध्ये नेलं. या सर्व प्रकारानं कोलकात्यात सध्या एकप्रकारचा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही कारवाई पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावरुन केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या कारवाई विरोधात आपण कोलकात्यातील मेट्रो सिनेमासमोर आंदोलन करणार असल्याचंही ममता बॅनर्जींनी यावेळी सांगितलं. "देशात सध्या आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यानंतर सीबीआयच्या हालचालींना वेग आला आहे. ज्यावेळी तृणमूल काँग्रेसचं सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं त्याचवेळी या प्रकरणातील आरोपींना अटक झाली होती", याची आठवणही ममता बॅनर्जींनी करुन दिली.
सीबीआय नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मोदी जे सांगत आहेत, तेच सीबीआय करत आहे. मी खुप अपमान सहन केला. सीबीआय जे करत आहेत ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या सांगण्यावरुन करत आहे, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जींनी केला.
काय आहे शारदा चिटफंड घोटाळा?
शारदा चिटफंड घोटाळा जवळपास 3 हजार कोटीं तर रोझ व्हॅली 15 हजार कोटींचा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. एप्रिल 2013मध्ये शारदा घोटाळा समोर आला होता. शारदा ग्रुपच्या कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले होते आणि ते परत केलेच नाहीत.
गुतवणूकदारांनी पैशाची मागणी सुरु केल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. घोटाळा उघड झाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होतं. शारदा ग्रुपने जवळपास 10 लाख गुतवणूकदारांना फसवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवण्यात आलं.