(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुंडांना हाताशी धरुन भाजपचं पोल खोल अभियान दाबण्याचा प्रयत्न, रथ तोडफोडप्रकरणी दरेकरांचा आरोप
भाजपच्या पोल खोल अभियानातील रथाची तोडफोड केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाली आहे. संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक केली नाही तर पोलिसांना घेराव घालू असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला.
मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपच्या पोलखोल अभियानाची आज सुरुवात होणार होती. परंतु त्याआधी अज्ञातांनी रथाची तोडफोड करत नुकसान केलं. मुंबईतील चेंबूर कॅम्प इथल्या भाजपा कार्यालयात विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रथयात्रेची सुरुवात होणार होती. परंतु रथयात्रेच्या आदल्या रात्री अज्ञाताने रथाची तोडफोड केली. संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक केली नाही तर पोलिसांना घेराव घालू असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला.
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन भाजपची पोल खोल अभियान दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. शिवाय रथाच्या तोडफोडीमागे शिवसेनेचा हात असल्याचा संशय प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. या रथाच्या तोडफोड प्रकरणी तक्रार करण्यासाठी प्रविण दरेकर यांनी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गेले. आरोपीला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडू. यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडली तर यासाठी सरकार पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.
BJP Pol Khol Rally : मुंबईतील भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची शिवसैनिकांकडून तोडफोड
मुंबई पोलीस आयुक्त हे सरकारचे राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. आम्ही लोकांसाठी पोल खोल करत आहोत तर मुंबई पोलीस हे सरकारचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत. इफ्तार पार्टी तसेच राजकीय कार्यक्रमात मुंबई पोलीस व्यस्त आहेत. पण पोल खोल यात्रेला अडथळा येणार नाही याबाबतची काळजी मुंबई पोलीस आयुक्तांनी घ्यावी, असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं.
तर महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबद भाजपच्या पोल खोल अभियानाची सुरुवात आज होणार होती. पण त्यातच काल रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दगड मारुन गाडीची काच फोडली. याला पोलिसांनी संरक्षण का दिलं नाही. जर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर या ठिकाणी भाजपचे सगळे नेते एकवटतील आणि जनतेच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.
दरम्यान भाजपच्या या पोल खोल अभियानाचा समारोप 1 मे रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
पोल खोल सभेच्या मंचाची तोडफोड
मुंबईतील कांदिवली होणाऱ्या भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची शिवसैनिकांनी तोडफोड केली. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर आज संध्याकाळी सात वाजता ही सभा होणार आहे. या पोल खोल सभेसाठी मध्यरात्रीपासून स्टेज बांधण्याचे काम करु करण्यात आलं होतं. मात्र रात्री एकच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आणि भाजपच्या सभेच्या स्टेजची तोडफोड केली.