अंधेरी पूल दुर्घटना : पश्चिम रेल्वेची वाहतूक 16 तासानंतर पूर्ववत
अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील गोखले पूल दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल 16 तासानंतर पश्चिम रेल्वेवरील जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत झाली आहे.
मुंबई : तब्बल 16 तासानंतर पश्चिम रेल्वेवरील जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत झाली आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील गोखले पुलाच्या फुटपाथचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळला होता. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
काल रात्री आठ वाजताच्या सुमारास अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने ट्रायल लोकल सोडण्यात आली होती. त्यानंतर 8 वाजून 23 मिनिटांनी चर्चगेटच्या दिशेने (अप) जलद वाहतूक सुरु झाली. तर रात्री 9 वाजून 41 मिनिटांनी विरारच्या दिशेने (डाऊन) लोकल वाहतूक सुरु झाली.
मध्यरात्री एक वाजता चर्चगेटच्या दिशेने धीम्या मार्गावरील वाहतूक सेवा सुरळीत झाली. धीम्या मार्गावर चर्चगेटच्या दिशेने पहिली लोकल मध्यरात्री एक वाजता धावली. विरारच्या दिशेने पहिली लोकल मध्यरात्री सव्वा एक वाजता धावली.
मंगळवारी सकाळी अंधेरी-विलेपार्ल्याचा पादचारी पूल रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काल संध्याकाळी या कोसळलेल्या पूलाचा ढिगारा रुळांवरुन बाजूला करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा सुरळीत होण्यास सुरुवात झाली. काल मुंबईकरांना मोठ मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र आज तिन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गोखले पुलाच्या फुटपाथचा काही भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा पूल होता.
गोखले पूल 1960-70 चा असल्याने खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र काल सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला. पूल आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या. ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा रेल्वे रुळावर साचला होता. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम बनलं होतं. अखेर काल संध्याकाळी हा ढिगारा काढण्यात आला आणि रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली .
संबधित बातम्या
अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमनचा इमर्जन्सी ब्रेक, अनेक प्रवाशांचे प्राण वाचले
अंधेरी पूल दुर्घटना : रेल्वे आणि रस्ते प्रवासासाठी पर्यायी मार्ग
अंधेरी पूल दुर्घटना : आतापर्यंत काय-काय घडलं?
अंधेरी स्टेशनवर पुलाचा भाग कोसळला, रेल्वे वाहतूक ठप्प
दादर ते अंधेरी, 500 ते हजार, टॅक्सी चालकांची मुजोरी
बीएमसीकडून पैसे घेता, मग जबाबदारी का झटकता, महापौरांचा रेल्वेला सवाल