Akshay Shinde : एन्काऊंटर होऊन 5 दिवस उलटले तरिही अक्षय शिंदेचा अंत्यविधी नाहीच, अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतही विरोधाचे बॅनर
Akshay Shinde : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा 5 दिवस उलटून गेले तरीही अंत्यसंस्कार झालेला नाही, आता अंबरनाथमधील हिंदूस्मशानभूमीत विरोधाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
Akshay Shinde, अंबरनाथ : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी एन्काऊंटर केला. मात्र, अजूनही त्याचा अंत्यविधी करण्यात आलेला नाही. अनेक शहरांमधून त्यांच्या अंत्यविधीला विरोध सुरुच आहे. आता अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध करण्यात येतोय. स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेधाचा बॅनर लावण्यात आला आहे. बदलापूर घटनेतील विकृत नराधम अक्षय शिंदेला अंबरनाथ हिंदूस्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात जाहीर निषेध असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलाय.
अंत्यविधी शांततेत करु, राज्य सरकारची हायकोर्टात हमी
अक्षय शिंदेचा अंत्यविधी होत नसल्याने त्याच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतली होती. अंत्यविधीला अनेक शहरांमधून विरोध होत आहे, त्यामुळे त्याचा अंत्यविधी होऊ शकत नाही, असं वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारी राज्य सरकारने घेतल होती. शिवाय, शिंदेचा अंत्यविधी शांततेत होईल याची पोलीस खबरदारी घेतील अशी हमीही राज्य सरकारकडून हायकोर्टात देण्यत आली होती. मात्र, अजूनही हा अंत्यविधी झालेला नाही.
दिवसभर पत्रकार थांबतात, मात्र सरकार दफनभूमीसाठी जागा देत नाही
अक्षय शिंदेचे वकिल अमित कटारनवरे म्हणाले, मी काहीच सांगणार नाही. परत परत तेच प्रश्न नको प्लीज ? बॉडीसाठी दिवसभर थांबलेत पत्रकार मित्र सुद्धा थांबलेत. मात्र सरकार दफन करण्यासाठी परवानगी देत नाही. दफन करण्यासाठी सरकार जागा देत नाही. मला त्याच्या वाईट वाटते तुमची मला सहानुभूती आहे. दिवसभर पत्रकार थांबतात, मात्र सरकार दफनभूमीसाठी जागा देत नाही. आपल्या देशात सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली तर याकूब मेमन सारख्या व्यक्तीला या देशात जागा मिळते. हेच सरकार असतं त्याच्या अंत्ययात्रेत अनेक जण येतात. मात्र अक्षयला कुठल्याही न्यायालयाने अद्याप दोषी ठरवला नाही तरी देखील त्याला दफनभूमीसाठी जागा मिळत नाही हे पटण्यासारखं आहे का ? असा सवालही कटारनवरे यांनी केलाय.
पुढे बोलताना कटारनवरे म्हणाले, सरकारला जागा मिळत नाही, तुम्हाला तरी वाटतंय का? ही गोष्ट पटण्यासारखी आहे का? मी स्वतः पाहिलं नाही आणि जोपर्यंत मी डॉक्यूमेंट पाहत नाही. खरोखरच जर त्याची बाजू न्यायला समोर मांडली असती सत्य काय ते बाहेर आला असतं. तर त्याला रंगा बिल्ला सारखी डबल फाशी दिली असती तरी काय हरकत नव्हती.
इतर महत्वाच्या बातम्या