Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Mahim Vidhan Sabha Election Result 2024: उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता.
Mahesh Sawant Win Amit Thackeray Sada Sarvankar: माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत (Mahesh Sawant) यांचा विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि राजपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा दारुन पराभव करत माहीममध्ये बाजी मारली.
अमित ठाकरेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून माहीम विधानसभा मतदारसंघाची महाराष्ट्रभर चर्चा सुरु होती. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीकडून पाठिंबा दिला जाईल, अशी शक्यता होती. परंतु सदा सरवणकरांनी माघार घेण्यास नकार दिला. तसेच आपण माघार घेतल्यानंतर त्याचा थेट फायदा ठाकरे गटाच्या महेश सावंत यांना होईल, असं भाकित सदा सरवणकर यांनी व्यक्त केलं होतं. सदा सरवणकरांनी माघार घ्यावी, यासाठी स्वत: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले. मात्र महायुतीच्या या सर्व नेत्यांना अपयश आले. त्यानंतर माहीममध्ये तिरंगी लढत रंगली आणि यामध्ये आज महेश सावंत यांनी बाजी मारली.
माहीममधील मतदानाचा टक्का वाढलेला टक्का सावंत यांच्या पारड्यात-
2019 च्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात 52.67 टक्के मतदान झाले होते. आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीममध्ये 58 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का 5.33 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे माहीममध्ये यंदा वाढलेला हा मतदानाचा टक्का महेश सावंत यांच्या पारड्यात पडल्याचे समोर आले आहे.
मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात- अमित ठाकरे
सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर तुम्ही आता माहीममधील तिरंगी लढतीकडे कसे पाहता?, असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावर ते समोर असते-नसते, तरी मी निवडणूक माझ्या पद्धतीनेच लढवली असती. मी लोकांमध्ये गेलोच असतो. मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात आहे, तर जिंकणार की नाही, हे देवाच्या हातात आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. तसेच मला अजिबात आव्हान वाटत नाही, असंही अमित ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले होते.