वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Vasai-Virar Vidhan Sabha Results 2024 : वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बवंआने 35 वर्षांची एकहाती सत्ता गमावली आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 : वसई-विरारमध्ये गेल्या 35 वर्षांपासून एकहाती सत्ता राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीला यंदा मोठा धक्का बसला आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. वसई विधानसभेत हितेंद्र ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर क्षितीज ठाकूर यांनाही नालासोपारा विधानसभेत हार पत्करावी लागली.
वसई विधानसभा
वसई मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले हितेंद्र ठाकूर यांना यंदा वसईच्या जनतेने नाकारलं आहे. भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडीत यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. ठाकूर कुटुंबाची ही पराभवाची पहिलीच वेळ आहे. वसई-विरारच्या जनतेने दिलेला हा निकाल संपूर्ण वसई-विरारसाठी धक्कादायक ठरला आहे.
नालासोपारा विधानसभा
नालासोपारामध्ये भाजपाचे राजन नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांचा पराभव भाजपाचे राजन नाईक यांनी केला. राजन नाईक यांनी विजयाच्या क्षणी कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाची आठवण करून देत भावनिक भाषण दिलं.
बोईसर विधानसभा
बोईसरमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे विजयी झाले आहेत.
राजकीय समीकरणे बदलली
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे त्यांचा मतदार विभागला गेला. यावेळी येथील जनतेने बहुजन वंचित आघाडीकडे पाठ फिरवली आणि सत्ता पालट केला. या पराभवाने बहुजन विकास आघाडीची वसई-विरारमधील मक्तेदारी संपली असून भाजप आणि शिंदे गटाने येथे आपली पकड मजबूत केल्याचं दिसत आहे. वसई, विरारमध्ये बहुजन वंचित आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.