ग्राहकांच्या समस्या आता घरबसल्या सुटणार, अदानी इलेक्ट्रिसिटीकडून मुंबईकरांसाठी चार नव्या डिजिटल सेवा सुरू
Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीकडून चार नव्या डिजिटल सेवा सुरू करण्यात आल्या असून ग्राहकांना त्याचा घरबसल्या लाभ घेता येणार आहे.
मुंबई : अदानी इलेक्ट्रीसिटीकडून (Adani Electricity) मुंबईकरांसाठी नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यात आल्या असून नागरिकांना आता त्याचा घरबसल्या लाभ मिळणार आहे. अदानी इलेक्ट्रीसिटीकडून चार नवीन डिजिटल सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या नवीन डिजिटल सुविधांचा ग्राहकांना त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या लाभ घेता येई येईल.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) नुकत्याच जाहीर केलेल्या देशातील वीज वितरण कंपन्यांच्या क्रमवारीत अदानी इलेक्ट्रिसिटीला मुंबईची प्रथम क्रमांकाची सेवा म्हणून स्थान दिले आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीने व्ही-असिस्ट हे व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी ग्राहक व्हिडीओवर कस्टमर केअर अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकतात. अशा प्रकारची अभिनव सेवा सुरू करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी ही जगातील वीज वितरण क्षेत्रातील पहिली कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटीकडून सुरु करण्यात आलेल्या सेवा
• व्हिडीओ कॉलद्वारे कस्टमर केअर अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची ग्राहकांना सुविधा.
• मूल्यवर्धित वैशिष्ट्यांसह संपूर्ण परवाना क्षेत्रामध्ये 70 स्व-मदत किऑस्कची सज्जता.
• कृत्रिम प्रज्ञेने (एआय) सक्षम चॅटबॉट ‘इलेक्ट्रा’ लवकरच मराठी, हिंदी भाषेत उपलब्ध होणार.
• ग्राहकांना वास्तविक वीज वापराच्या सदासर्वकाळ देखरेखीची मुभा देणारे स्मार्ट मीटर्स.
अदानी इलेक्ट्रिसिटीकडून ग्राहकांना रोख आणि धनादेशाद्वारे देयक भरणा करण्याचा पर्याय, रोख बदल स्वीकारण्याचा पर्याय, देयकाच्या काही भागाचा भरणा करण्याचा पर्याय, देयकाची प्रत डाउनलोड करणे, तक्रारी नोंदवणे आणि व्हिडीओ कॉल्समध्ये संपर्क साधणे यासारख्या विशेष क्षमतांसह प्रगत स्व-मदत (सेल्फ हेल्प) किऑस्क देखील सुरू केले गेले आहेत. वीज वितरण कंपनीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी सोयीस्करपणे असे 70 सेल्फ हेल्प किऑस्क यंत्र बसवले आहेत.
अदानी समूहाचा एक भाग असलेली अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड ही वीज निर्मिती, पारेषण आणि किरकोळ वीज वितरण अशा एकात्मिक व्यवसायात कार्यरत आहे. एईएमएलकडे भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात कार्यक्षम वीज वितरण जाळ्याची मालकी आणि संचालन केले जाते. एईएमएल 400 चौरस किमी मध्ये पसरलेल्या 30 लाख ग्राहकांना सेवा देते. मुंबई आणि तिच्या उपनगरामध्ये 99.99 टक्के विश्वासार्हतेसह देशातील सर्वाधिक अशा सुमारे 2000 मेगावॅट वीज मागणीची ती पूर्तता करते.