भुवनेश्वरकडून मुंबईत येणाऱ्या सुपर फास्ट एक्स्प्रेसमधून 55 किलो गांजा जप्त, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई
भुवनेश्वरकडून मुंबईत येणाऱ्या भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमध्ये कल्याण पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
कल्याण : अमली पदार्थांची खरेदी विक्री करणे कायदेशीर गुन्हा असतानाही चोरट्या मार्गाने गांजा, ड्रग्जसारखे विविध अमली पदार्थांची खरेदी विक्री सुरु असते. दरम्यान भुवनेश्वरवरुन मुंबईकडे येणाऱ्या सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून तब्बल 55 किलो गांजा ज्याची किंमत 5 लाख 53 हजार रुपये इतकी आहे, तो जप्त करण्यात आला आहे. कल्याण आरपीएफ आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हा गांजा आणणाऱ्या सम्राट बाबुराव पात्रा, संजू अहमद गाजी आणि अजगर अली बहाद्दूर खान या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या तिघांमध्ये भांडण सुरु असताना एक्स्प्रेसमध्ये पेट्रोलिंगदरम्यान आरपीएफ जवानांचे त्यांच्याकडे लक्ष गेले, त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. त्यानंतर या तिघांनाही कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्यांनी हा गांजा कुठून आणला आणि कोणाला त्याची विक्री केली जाणार होती याचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांकडून सुरु आहे.
असा पकडला पोलिसांनी गांजा
कल्याण आरपीएफचे निरीक्षक भूपेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सी जी रुपदे यांचे पथक बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईकडे येणाऱ्या भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगीत इगतपुरी ते कल्याण दरम्यान पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान वातानुकूलीत बी 3 बोगीतून प्रवास करणारे तीन प्रवासी आपआपसांत भांडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे आरपीएफच्या पथकाने विचारणा करत असताना या तिघांमधील एकाने सीट खाली असलेली बॅग आत मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. या तिघांच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव पाहता त्यांच्यावरील संशय बळावला, यामुळेच आरपीएफच्या जवानांनी या तिघांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे असलेल्या ट्रोली बॅगमध्ये सुमारे 5 लाख 53 हजार 950 रुपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसानी तात्काळ या तिघांना अटक करत गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा-
- Navi Mumbai : सलग दोन दिवस लाखोंचे अमली पदार्थ जप्त, नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
- एक्स्प्रेसमध्ये दागिने चोरणाऱ्या सासू सूनांना ठोकल्या बेड्या, कल्याण रेल्वे क्राइम ब्रांचची कारवाई
- KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha