(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मतदानासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज; जिल्ह्यातील 626 केंद्रांवर 3455 कर्मचारी आणि पोलीस यंत्रणा तैनात
पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 29 जागांसाठी पाच ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे.
Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Palghar district : पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 29 जागांसाठी पाच ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी 626 मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 3455 अधिकारी-कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे विविध 15 गट आणि पंचायत समितीचे 14 गण यांच्या मतदानासाठी प्रशासनामार्फत विविध साहित्याची जुळवाजुळव सुरु असून ईव्हीएम मशीन आदींसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. काही ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झालं असून काही ठिकाणी सुरु आहे. गट आणि गणाच्या निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या प्रांत अधिकाऱ्यांसह तहसीलदार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मतदान केंद्रसाठी आढावा घेतला जात आहे. ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तालुकास्तरीय कार्यालय ठेवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने तेथे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि साहित्य वितरित करण्यासाठी मंडप बांधण्याचे काम जोरदार सुरु आहे. याचबरोबरीने मतमोजणी करण्यासाठीही या ठिकाणी विशेष सुरक्षेसह कक्षाची तयारी केली जात आहे. प्रत्येक अधिकारी वर्गाला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली जबाबदारी या अनुषंगाने मतदानाची पूर्वतयारी सुरू करण्यात आलेली आहे. तालुकास्तरीय मतदान केंद्र अधिकारी यांच्यामार्फत गण व गटात मतपत्रिका वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नागरिकांना मतपत्रिका वाटप केले जात असल्याचे तालुका कार्यालयांमार्फत सांगितले गेले आहे. तसेच मतदार यादी मतदानासाठी तयार केल्या गेल्या आहेत.
निवडणुकांच्या मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर वाढला असला तरी या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासह निवडणूक आचारसंहिता प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीमार्फत विविध नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारीवर्ग मार्फत छायाचित्रीकरण करणे, देखरेख ठेवणे,फिरती पथके अशी कामे करण्यात येत आहेत.
पालघर जिल्ह्यात जिपचे पंधरा गट आणि पंचायत समितीचे 14 गट मिळून तीन लाख 67 हजार 602 मतदार आहेत. यामध्ये एक लाख 80 हजार 915 स्त्रिया तर 1 लाख 86 हजार 693 पुरुष मतदार यांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रामध्ये केंद्रप्रमुख यांच्यासह अधिकारी वर्ग, शिपाई यांची तरतूद केलेली आहे. त्याचबरोबरीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्रत्येक केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराला हाताचे निर्जंतुकीकरण त्याचबरोबरीने तोंडाला मूखपट्टी लावणे असे जनजागृतीपर संदेशही प्रशासनामार्फत देण्यात आलेले आहेत. त्या दृष्टीने नागरिकांनीही मतदानाची नैतिक जबाबदारी पार पाडताना करोना संबंधातील उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनामार्फत सांगितले गेले आहे. सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. ही प्रक्रिया संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ईव्हीएम मतदान यंत्रांची बिघाड होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच प्रत्येक केंद्रांवर अतिरिक्त यंत्रे दिली जाणार आहेत.
मतदान करणारे एकूण मतदार : 367612
महिला मतदार : 180915
पुरुष मतदार : 186693
मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गासह पोलीस वर्गही तैनात राहणार आहे. प्रत्येक केंद्रांवर किमान एक ते दोन पोलीस शिपाई यासह पोलीस अधिकाऱ्यांची फिरती पथकं आणि त्याच्यावर त्या भागातील उपविभागीय अधिकारी लक्ष ठेवून राहणार आहेत.
मतदार आणि मतदान केंद्र संख्या
तालुका | मतदार | केंद्र संख्या | गट | गण |
तालसरी | 15985 | 27 | 1 | 0 |
डहाणू | 84434 | 142 | 4 | 2 |
विक्रमगड | 16922 | 30 | 1 | 0 |
मोखाडा | 29579 | 54 | 2 | 0 |
वाडा | 96709 | 170 | 5 | 1 |
पालघर | 108640 | 175 | 2 | 9 |
वसई | 15343 | 28 | 0 | 2 |
एकूण | 367612 | 626 | 15 | 14 |
तालुका | अधिकारी | कर्मचारी |
तलासरी | 27 | 150 |
डहाणू | 142 | 785 |
विक्रमगड | 30 | 165 |
मोखाड | 54 | 295 |
वाडा | 170 | 935 |
पालघर | 175 | 965 |
वसई | 28 | 160 |
एकूण | 626 | 3455 |