(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronvirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागात दोन शिफ्टमध्ये काम
जलसंधारण विभागाने सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट केलेल्या आहेत. यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत.
मुंबई : एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत ही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयात चालतो त्या मंत्रालयातील मंत्री, कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत.अशा वेळी राज्यातील जलसंधारण विभागाने एक वेगळं पाऊल उचलले आहे. ते म्हणजे मंत्रालयात त्या विभागात दोन शिफ्टमध्ये कामकाज करण्यात येणार आहे.
जलसंधारण विभागाने सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट केलेल्या आहेत. यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. मंत्रालयात येणारे कर्मचारी यांना लोकल ट्रेन बस मधून प्रवास करावा लागतो. त्या गर्दीत ही कोरोना धोका कायम आहे. एकाचवेळी अनेक कर्मचारी असण्यापेक्षा दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी विभागून जलसंधारण विभागाने एक प्रयत्न केला आहे.
15 मार्च पासून या दोन शिफ्ट मध्ये कामकाज चालणार आहे. यामुळे कामावर काही परिणाम होतो का हे देखील पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण मंत्रालयात पहिल्यांदाच अशा पद्धतीने शिफ्ट मध्ये काम करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर विभागातही शिफ्ट मध्ये काम करता येईल का हा विचार करण्यात येणार आहे. पण सुरुवात सध्या तरी जलसंधारण विभागाने केली आहे.
कोरोना काळात कामचं स्वरूप आणि कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. खासगी क्षेत्रात शिफ्ट मध्ये काम केले जाते. पण सरकारी कार्यालयात जिथे नेहमी कार्यालयीन कामकाजवर टीका होते तिथे देखील हा नवीन प्रयोग आता होणार आहे.
संबंधित बातम्या :
सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड, सरकारी कार्यालयात कोणते कपडे घालावे याबाबतचे निर्देश जाहीर
मंत्रालयात मंत्री अधिकारी, कार्यालयात खाण्यापिण्याची उधारी अडकली! वसुलीसाठी काढलं परिपत्रक