महिला बँकेत भांडतात, लाडकी बहीण योजनेनं कर्मचारी संतापले, काम वाढले; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
बँकेचे वेगवेगळे चार्जेस आणि मिनिमम बॅलन्समुळे महिलांच्या बँक खात्यात जमा झालेल्य रकमेतून काही रक्कम कपात करण्यात आली आहे
मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून सत्ताधारी आणि विरोधकही योजनेच्या श्रेयावरुन आमने-सामने आहेत. दुसरीकडे या योजनेचे पैसे म्हणजेच दोन महिन्यांचे 3000 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्याने ज्या महिलांना अद्याप योजनेचे पैसे मिळाले नाहीत. त्या महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे, तसेच बँकेत जाऊन आधार लिंक स्टेटसही पाहिलं जात आहे. त्यामुळे, बँकेत महिला भगिनींची मोठी गर्दी होतानाचे चित्र सर्वच शाखांमध्ये आहे. त्यातून, महिलांची बँक कर्मचाऱ्यांशी भांडण होत आहेत, तसेच महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता बँक कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.
बँक कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारची लोकप्रिय 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'मुळे बँकेत गर्दी वाढली असून महिला भगिनी बँकेत खाते उघडण्यासाठी येत आहेत. बँकेतील होणारी गर्दी पाहाता सुरक्षा आणि अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात यावे, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन करण्यात आली आहे. राज्यातील 90 लाखांपेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम मिळाली असून थेट 3000 रुपये बँकेत जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे पैसे जमा होत असल्याने आता इतर महिलांची बँकेत खाते उघडण्यासाठी गर्दी वाढली आहे. तर, सरकारने जमा केलेले पैसे काढण्यासाठीही महिला बँकेत गर्दी करत आहेत. दरम्यान, बँकेत नव्याने उघडण्यात आलेल्या बँक खात्यांपैकी 20% अकाउंटची केवायसी झालेली नाही, त्यामुळे केवायसी करण्यासाठी गर्दी होत आहे.
महिलांची कर्मचाऱ्यांशी भांडणं
बँकेचे वेगवेगळे चार्जेस आणि मिनिमम बॅलन्समुळे महिलांच्या बँक खात्यात जमा झालेल्य रकमेतून काही रक्कम कपात करण्यात आली आहे. सरकारने पाठवलेल्या 3000 रुपये रक्कमपैकी काही रक्कम कपात केल्यामुळे महिला बँकेतील कर्मचाऱ्यांशी भांडत आहेत. एकीकडी गर्दी, दुसरीकडे भांडणं, यामुळे गर्दीचे नियोजन होत नाही. या सगळ्या बाबींची नोंद करुन बँक कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तसेच, आम्हाला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही या पत्रातून त्यांनी केली आहे.
15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांना लाभ
याआधी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 14 ऑगस्ट रोजी 32 लाख महिलांना तर 15 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते. 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर सध्या 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. नंतर हळूहळू सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातील.
राज्यात 96 लाख महिलांना मिळाला थेट लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते. सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा
लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट, आज निवडणूक झाल्यास कोणाचं सरकार?; AI सर्वेक्षणाचा आश्चर्यजनक निकाल