Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ahilyanagar Crime : पुण्यातील एका अनाथ मुलीशी लग्न लावून देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपये उकळून लग्नाळू मुलाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडला आहे.
Ahilyanagar Crime : पुण्यातील (Pune) एका अनाथ मुलीशी लग्न (Marriage) लावून देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपये उकळून लग्नाळू मुलाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे लग्न लावून देणाऱ्या व्यक्तींना ठरवलेली रक्कम देण्यासाठी लग्नाळू मुलाने व्याजाने पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण भागामध्ये लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळ्या अनेक ठिकाणी सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून या टोळ्या सक्रिय झाल्या असून अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. बदनामीच्या भीतीने फसवणूक झालेल्या अनेक घटना समोरही येत नाहीत.
लग्नाळू मुलाची 5 लाखांची फसवणूक
अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बाबू मत्रे या 28 वर्षीय तरुणाचीही अशीच फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील एक अनाथ मुलीशी लग्न लावून देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपये त्याच्याकडून उकळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लग्न लावून देणाऱ्या व्यक्तींना ठरवलेली रक्कम देण्यासाठी बाबू याला व्याजाने पैसे घ्यावे लागले आहेत.
फसवणुकीचे प्रकार वाढले
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलांची अशा पद्धतीने फसवणूक होण्याचे प्रकार अधिक आहेत. मात्र ज्या घटना पोलिसात दाखल झाल्या त्या सर्व घटनांचा तपास पोलिसांनी लावल्याचा दावा करत आहेत, तरी सुद्धा अनेक लग्नाळू तरुण अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.
किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण
दरम्यान, नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथे किरकोळ कारणावरून वाद होऊन तरुणाला मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. कृष्णा जानकू हातेकर (34, रा. नांदगाव शिंगवे) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकील माणीक शेख (रा. नांदगाव शिंगवे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी आपल्या घराजवळील मंदिरासमोर बसले असताना त्यांचा पुतण्या त्यांच्याजवळ आला. त्यावेळी त्याने फिर्यादीची चेष्टा केली. त्यामुळे फिर्यादी पुतण्यास मोठ्याने बोलले असता गावातील शेजारी राहत असलेला शकील शेख याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. फिर्यादीने त्यास जाब विचारला असता त्याने जवळील दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला. फिर्यादीने केल्यानंतर आरडाओरड त्यांची आई जनाबाई हातेकर या मदतीसाठी धावल्या असता शेखने त्यांच्यावरही हात उचलला. यानंतर त्याने दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा