नियोजन करूनही गणपती स्पेशल एक्सप्रेस का सुटल्या नाहीत? वाचा याचे कारण...
मुंबई आणि आसपासच्या शहरातील चाकरमानी गावी जाण्यासाठी तयारीला लागले होते. तिकीट काढण्यासाठी पैसे जमा करत होते. मात्र त्यांच्या या सर्व तयारीवर राज्य सरकारनेच विरजण टाकले आहे.
ठाणे : कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वेने गावी जायचे स्वप्न सध्या अधांतरी आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार रेल्वे मंत्रालयाने 11 ऑगस्ट पासून कोकणात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र काल रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून कोणतेही अंतिम आदेश न आल्याने अखेर या गाड्या न सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
दरवर्षी कोकणात जाण्यासाठी लाखो चाकरमानी कोकण रेल्वेच्या जलद आणि स्वस्त पर्यायचा अवलंब करतात. कारण एसटीची सेवा चांगल्या दर्जाची नसते आणि खाजगी बसेसच्या तिकिटांच्या किमती या आकाशाला भिडलेल्या असतात. त्यामुळेच कोकण रेल्वे हाच एक पर्याय त्यांच्यासमोर करतो. यावर्षी मात्र लॉकडाऊन असल्यामुळे 22 मार्च पासून देशातील रेल्वेसेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरू होणार की नाही असा प्रश्न सर्व कोकणवासीयांना पडला होता. मात्र 7 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला एक पत्र लिहिले आणि त्यात कोकणात जाण्यासाठी गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी विनंती केली. ही बातमी आल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या शहरातील चाकरमानी गावी जाण्यासाठी तयारीला लागले होते. तिकीट काढण्यासाठी पैसे जमा करत होते. मात्र त्यांच्या या सर्व तयारीवर राज्य सरकारनेच विरजण टाकले आहे.
राज्य सरकारने ही विनंती केल्यानंतर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने विशेष एक्सप्रेस गाड्यांचे नियोजन केले होते. हे नियोजन रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आले. रेल्वे बोर्डाने देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अकरा तारखेपासून या गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रवासी जे तिकीट काढतील ते तिकीट म्हणजे त्यांचा ई पास असणार होता.
कशा प्रकारचे होते नियोजन?
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि एल टी टी या स्थानकातून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, अंधेरी, वांद्रे आणि वडोदरा स्थानकातून कोकण रेल्वेच्या सावंतवाडी आणि इतर स्थानकांत पर्यंत गाड्या सोडण्यात येणार होत्या. अकरा तारखेपासून या गाड्या सोडण्यात येणार होत्या.
कोणत्या गाड्या होत्या?- सीएसएमटी ते सावंतवाडी
- एल टी टी ते कुडाळ
- एल टी टी ते सावंतवाडी
- एल टी टी ते रत्नागिरी
- मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी
- बांद्रा टर्मिनस ते सावंतवाडी
- अंधेरी ते सावंतवाडी
- अंधेरी ते कुडाळ
- बांद्रा टर्मिनस ते कुडाळ
- वडोदरा ते रत्नागिरी
मात्र दहा तारखेला राज्य सरकार कडून कोणत्याही प्रकारचे अंतिम आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसरकारने कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्या काही दिवस सोडू नका असे तोंडी आदेश रेल्वेला दिले आहेत. त्यामुळेच नियोजन करून देखील कोकणात विशेष गाड्या सोडण्यात आल्या नाहीत. राज्य सरकारने असा निर्णय का घेतला याचे कारण अजुनही गुलदस्त्यात आहे. मात्र विलगीकरण कक्षांची पुरेशी सोय नसल्याने असा निर्णय घेण्यात आल्याचे कारण समजते आहे. कारण काहीही असले तरी राज्य सरकारच्या या कोलांटीउडी मुळे चाकरमान्यांचे स्वप्न तूर्तास भंग झाले आहे. शेवटी प्रचंड पैसे भरून खासगी बसने किंवा एसटी बसने जाण्याचा पर्याय चाकरमान्यांसमोर उरला आहे.
Ganeshotsav 2020 | गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेकडून 250 खासगी बसेसची सोय