Wardha : 'पकडलेला ट्रक सोडा अन्यथा विष घेईन' म्हणत तहसीलदाराच्या कक्षातच आत्महत्येचा प्रयत्न
आर्थिक कोंडीत सापडलेल्या रेती व्यावसायिकाने तहसीलदाराच्या कक्षातच विष घेतल्याची घटना घडली आहे.
वर्धा : ट्रक पकडल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या रेती व्यावसायिकाने थेट तहसीलदारांच्या कक्षातच आत्महत्येचा प्रयत्न केला. "माझा ट्रक सोडा अन्यथा मी विष घेईन" म्हणत व्यवसायिकाने चक्क तहसीलदारांच्या डोळ्यासमोर तोंडाला विषाची बॉटल लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समुद्रपूर तहसील कार्यालयात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथिल रेती व्यवसायीकाने तहसीलदारांनी पकडलेला टिप्पर सोडण्यासाठी विनंती केली. अखेर त्याने चक्क तहसीलदाराच्या नजरेसमोर कक्षातच विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
'आई अन्नपूर्णा बिल्डिंग मटेरियल' या नावाने प्रविण शंकरराव शेंडे, वय 35, रा. मांडगाव हा रेतीचा व्यवसाय करीत होता. दरम्यान, वणी नदी पात्रातून 22 एप्रिलला अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळल्याने महसूल विभागाच्या पथकाने प्रविण शेंडे याचे टिप्पर आणि ट्रॅक्टर जप्त केले होते. यामुळे प्रविणची आर्थिक कोंडी झाल्याने तो तणावात अस्वस्थ राहयचा. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास "माझा टिप्पर सोडवा" अशी विनंती करण्यासाठी प्रवीण हा समुद्रपूर तहसील कार्यालयात तहसिलदाराच्या कक्षात गेला. त्याने तहसीलदार राजू गणवीर यांच्याकडे टिप्पर सोडवण्याची विनवणी केली.
दरम्यान, तहसीलदार राजू रणवीर यांनी सदर प्रकरणातील अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला असल्याने 'आपण हिंगणघाट येथिल उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा' असे सुचवले. आर्थिक विवंचनेत असल्याने निराश होऊन व्यावसायिक प्रविण शेंडे याने आपल्या खिशातून विषाची बॉटल काढून तोंडाला लावली. ही बाब तहसीलदार राजू रणवीर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताबडतोब स्वतःच्या खुर्चीवरून उठून प्रविणकडे धाव घेऊन त्याच्या हातातील विषाची बॉटल खाली पाडली. तितक्यात दोन ते तीन घोट विष प्रविण याने प्राशन केले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.
तातडीने उपचारासाठी केलं दाखल
रेती व्यावसायिकाने विष घेतल्यावर समुद्रपूर येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तिथं प्राथमिक उपचार झाल्यावर प्रकृती चिंताजनक होऊ नये म्हणून त्याला पुढील उपचाराहेतू सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. मात्र थेट तहसीलदारांच्या कक्षातच घडलेल्या या धक्कादायक घटनेने तालुका प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संबंधी समुद्रपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.