(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinayak Mete Death : मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी घेणार? विनायक मेटेंचा अपघात की घातपात? सत्य समोर यावं- आबासाहेब पाटील
Vinayak Mete Death : मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी घेणार? विनायक मेटेंच्या मृत्यूनंतर सवाल आबासाहेब पाटील यांनी केला आहे
Vinayak Mete Death : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मेटेंच्या मृत्यूबाबत हा अपघात की घातपात? अशी शंका व्यक्त केली आहे. काय म्हणाले पाटील?
घटनेमागचं सत्य समोर यावं. या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे - आबासाहेब पाटील
मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी घेणार? आज मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची बैठक बोलावली होती, त्यासाठी विनायक मेटे हे मुंबईला येत होते. मुंबई द्रुतगती मार्गावरून येत असताना ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर जवळपास दोन तास रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात? घटनेमागचं सत्य समोर यावं. या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे. अशा मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालंय.
आबासाहेब पाटील पुढे म्हणाले. हा एक लढवय्या नेता होता, ज्यानी मराठा समाजासाठी सभागृहात आवाज उठवला. समाजाच्या आरक्षणाबाबत प्रचंड अभ्यास केला. समाजाचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले. मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालंय. आमची विनंती आहे. की मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि याचा लवकरात लवकर निकाल लावावा. आणि मराठा आरक्षण देऊन मेटे यांचं स्वप्न पूर्ण करावं. हीच खऱ्या अर्थाने मेटेंना भावपूर्ण श्रद्धांजली असेल.
मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाच्या चौकशी दिले आदेश
विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसला नाही. मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. गेल्याच आठवड्यात विनायक मेटे मला भेटले होते, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर आजचा दिवस खूप दु:खद आहे. राजकारणाची कधीच भरुन न निघणारी हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले.
तासभर मेटेंना कुठलीही मदत मिळाली नव्हती.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.