Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
Bhagwangad mahant in Beed: धनंजय मुंडे यांना भगवान गडाचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी यावरुन नामदेव शास्त्रींना लक्ष्य केले आहे.

धाराशिव: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मंत्रिपदावर गंडांतर ओढवलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना शुक्रवारी भगवान गडाच्या (bhagwangad) महंतांनी पाठिंबा दिला. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गुन्हेगार नाहीत, त्यांची मिडिया ट्रायल केली जात आहे, असे सांगत भगवान गड या संकटात त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असे वक्तव्य नामदेव शास्त्री (namdev shastri) महाराजांनी केले होते. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते शुक्रवारी धाराशिवमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
धनंजय मुंडे यांना मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. मीडिया ट्रायल का केली जात आहे, त्याचा विचार धनंजय मुंडेंनी करायला हवा. बीड जिल्हा परिषदेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास दिला होता, आज ते भांडत आहेत. स्वतः ला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते. न्यायाचार्य असणाऱ्या डॉ. नामदेव शास्त्रींनी न्याय देताना स्त्री-पुरुष असा भेद केला. महाराजांनी आपली प्रतिज्ञा तोडली आणि एक राजकीय भूमिका घेतली, असा थेट आरोप प्रकाश महाजन यांनी केला. आता धनंजय मुंडे संकटात आहेत असं वाटत नाही. मीडियातून तसा भास निर्माण केला जातो आहे. नामदेव शास्त्री आणि समाज त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे, त्याबाबत कोणी बोलावे असं नाही, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.
धनंजय मुंडे हे गुरुवारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर भगवान गडावर आले होते. काल रात्री त्यांनी भगवान गडावर मुक्काम केला. यावेळी त्यांनी नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभा असल्याचे जाहीर केले होते. वंजारी समाजाच्या जनतेची भगवान बाबांवर अपार श्रद्धा आहे. त्यामुळे भगवान गड आणि त्याचे महंत असणारे नामदेव शास्त्री महाराज यांचा शब्द वंजारी समाजासाठी अंतिम मानला जातो. या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा अनेक अर्थांनी चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
